

Mukesh Ambani Guru Dakshina of Rs. 150 crore
मुंबई : प्रसिद्ध उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांच्या मातृसंस्थेला म्हणजेच आयसीटी मुंबई (Institute of Chemical Technology) ला 151 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे. ही देणगी त्यांनी 'गुरु दक्षिणा' म्हणून प्रा. एम. एम. शर्मा यांच्या आदेशानुसार दिल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे औचित्य होते प्रा. शर्मा यांच्या जीवनावर आधारित 'Divine Scientist' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन. अंबानी यांनी या वेळी सांगितले की, "मी UDCT (आताचे ICT) मध्ये जेव्हा पहिले व्याख्यान ऐकले, ते प्रा. शर्मा यांचेच होते आणि त्याच क्षणी त्यांनी मला प्रेरित केले."
अंबीनी म्हणाले, "प्रा. शर्मा यांनी केवळ शिक्षण आणि संशोधनात योगदान दिले नाही, तर भारताच्या आर्थिक सुधारणांच्या दिशेनेही शांतपणे, पण प्रभावीपणे काम केले. त्यांनी धोरणकर्त्यांना समजावून सांगितले की, भारतीय उद्योगांना परवाना-परमिट-राजमधून मुक्त केल्यासच आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करता येईल."
अंबानी यांनी आपल्या वडिलांचा संदर्भ देत सांगितले की, "धीरुभाई अंबानी आणि प्रा. शर्मा दोघेही भारतीय उद्योगांना जागतिक नेतृत्वाच्या दिशेने घेऊन जाण्याची दृष्टी बाळगत होते. विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यांच्या संयोगातून समृद्धीचा मार्ग खुला होतो, हे त्यांचे समान स्वप्न होते."
या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी ICT ला 151 कोटी रुपयांची अटींविना देणगी जाहीर करताना सांगितले, "शर्मा सरांनी मला सांगितले, ‘मुकेश, तुम्ही ICT साठी काहीतरी मोठं केलं पाहिजे’, आणि मी त्यांचं ऐकलं. जेव्हा ते काही सांगतात, तेव्हा आम्ही विचार न करता ऐकतो."
या कार्यक्रमात प्रा. शर्मा यांचे माजी विद्यार्थी, ज्यांनी पुढे जाऊन भारतीय विज्ञान आणि उद्योगक्षेत्रात मोठे योगदान दिले आहे, त्यांनीही आपल्या आठवणी आणि भावना व्यक्त केल्या.
प्रा. शर्मा यांचे शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील 60 वर्षांहून अधिक काळाचे कार्य, त्यांची विनम्रता, आणि विद्यार्थ्यांवरील प्रभाव याची साक्ष देणारा हा कार्यक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रम ICT च्या पिडिलाईट सभागृहात पार पडला आणि अध्यक्षस्थानी वरिष्ठ अणुसंशोधक अनिल काकोडकर होते. या वेळी रघुनाथ माशेलकर, जे. बी. जोशी, अनिरुद्ध पंडित आणि जी. डी. यादव यांच्यासह अनेक मान्यवर शास्त्रज्ञ उपस्थित होते.
रिलायन्स इंडस्ट्रीजने यापुर्वी आयआयटी मुंबईसारख्या शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्रांसाठीही आर्थिक मदत केली आहे. रिलायन्सने डिजिटल शिक्षण व तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात डिजिटलीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.
मुकेश अंबानी पब्लिक स्कूल ही मुंबईतील खाजगी शाळा मुकेश अंबानी यांच्या नावावर असून येथे उत्कृष्ट शिक्षणासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अंबानी फाउंडेशनद्वारे ग्रामीण भागात शैक्षणिक विकासासाठी शिष्यवृत्ती, शाळा उभारणी, आणि शिक्षणासंबंधी इतर योजना राबवण्यात येतात.
धीरुभाई अंबानी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (DA-IICT) गांधीनगर या संस्थेला अंबानींनी मोठी आर्थिक मदत केली आहे. DA-IICT ही भारतातील अत्याधुनिक संगणक आणि माहिती तंत्रज्ञान संस्था आहे.