

Anant Ambani- Radhika Merchant Wedding Anniversary
मुंबई : एका विवाह सोहळ्याने केवळ दोन जीवांनाच नव्हे, तर भारताच्या परंपरा, अध्यात्म आणि जागतिक प्रभावाला एकाच धाग्यात गुंफले. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या पूर्ण जगभर चर्चेचा विषय झालेल्या ऐतिहासिक सोहळ्याला एक वर्ष पूर्ण होत आहे, ज्याच्या स्मृती आजही अनेकांच्या मनात तितक्याच ताज्या आहेत.
एका वर्षापूर्वी 2024 मध्ये, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. तसं पाहिलं तर विवाह हा एक कौटुंबिक समारंभ असतो. मात्र हा सोहळा केवळ एक कौटुंबिक समारंभ नव्हता, तर ते एक असे सांस्कृतिक महापर्व होते, ज्याने भारताच्या समृद्ध परंपरेचा जागर करत संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधून घेतले. हा सोहळा आधुनिक भारताच्या आकांक्षा आणि त्याच्या सनातन मूल्यांशी असलेले बंध यांचा एक अभूतपूर्व संगम ठरला, ज्याने भारताला जागतिक पटलावर एका नव्या भूमिकेत सादर केले.
भारताची जागतिक प्रतिमा उंचावली
जागतिक पातळीवर भारताने आत्मविश्वासाच्या बळावर आपले स्थान बळकट केले आहे. आर्थिक, तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये भारत प्रगती करत आहे. शिस्तबद्ध नियोजन आणि आध्यात्मिक वातावरण यामुळे अनंत अंबानी- राधिका यांचा विवाहसोहळा भारताची “जगातील आध्यात्मिक राजधानी” अशी ओळख बळकट करणारा ठरला. विवाहसोहळ्यात उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या यादीतूनच भारताची वाढती जागतिक लोकप्रियता आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमधील वाढती भूमिका स्पष्ट झाली.
या सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी भारताची वाढती आर्थिक, राजकीय, बौद्धिक आणि वैज्ञानिक ताकद अधोरेखित केली. विविध क्षेत्रांतील जागतिक स्तरावरील मान्यवरांना एकत्र आणण्याची रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अंबानी कुटुंबाची क्षमता ही त्यांच्या सर्वसमावेशक आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्याच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब होती. भारताला जागतिक नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे नेण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत, हे यातून स्पष्ट होते.
परंपरेचा सन्मान : विवाहाच्या मूळ तत्त्वांचे पुनरुज्जीवन
हिंदू धर्मात विवाह हा केवळ दोन व्यक्तींमधील करार नसून, ते दोन कुटुंबे आणि दोन आत्म्यांचे पवित्र मिलन मानले जाते. आजच्या वेगवान युगात, जिथे अनेकदा पारंपरिक विधींना सोयीनुसार संक्षिप्त रूप दिले जाते, तिथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी प्रत्येक विधी पूर्ण श्रद्धेने आणि पारंपरेचा सन्मान करत पूर्ण केला. हिंदू विवाहाचा उद्देश वैयक्तीक समाधानाच्या पलिकडे असून धार्मिक कर्तव्याचे पालन अन् सामाजिक व्यवस्थेचे संचलन हा असतो. त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात वडिलधार्या लोकांच्या आणि अध्यात्मिक संत-महंतांच्या आशीर्वादाने व्हावी अशी त्यांची इच्छा होती. या पवित्र विधींच्या माध्यमातून या दाम्पत्याने केवळ वैयक्तिक वैवाहिक जीवनाची सुरुवात केली नाही, तर आधुनिकतेच्या वेगात हरवत चाललेल्या भारतीय मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
जागतिक नेतृत्वाचा संगम : अध्यात्म, राजकारण आणि उद्योग एकाच व्यासपीठावर
या विवाह सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे जमलेला जागतिक स्तरावरील अभूतपूर्व जनसागर. अध्यात्म, राजकारण आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांतील दिग्गज या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भारतात आले होते, जे अंबानी कुटुंबाच्या जागतिक संबंधांचे आणि भारताच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक होते.
आध्यात्मिक नेतृत्वाची मांदियाळी
प्राचीन काळापासून भारत ही अध्यात्माची भूमी आहे. भारताची ऋषी परंपरा आजही जिवंत आहे. या दिव्य सोहळ्याला भारतीय आध्यात्मिक परंपरेचा स्पर्श होता. सोहळ्याला लाभलेले आध्यात्मिक आशीर्वाद केवळ अद्वितीय होते. भारताच्या कानाकोपर्यातून आणि विविध संप्रदायांमधून आलेल्या संत-महंतांच्या उपस्थितीने या मंगल प्रसंगाची उंची वाढवली.
‘मानव सेवा हीच माधव सेवा’
‘मानव सेवा हीच माधव सेवा’ या भारतीय तत्त्वाला अनुसरून अंबानी कुटुंबाने या सोहळ्याची सुरुवात एका अनोख्या सेवाकार्याने केली. नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये 50 गरजू जोडप्यांचा सामूहिक विवाह लावून देण्यात आला. याशिवाय विवाहकाळात तीन आठवड्यांपर्यंत दररोज हजारो लोकांना अन्नदान करण्यात आले, ज्यामुळे या उत्सवाला खर्या अर्थाने एक सेवाभावी परिमाण मिळाले.
एक सांस्कृतिक दस्तावेज
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा केवळ दोन व्यक्तींच्या मीलनापुरता मर्यादित राहिला नाही. तो भारतीय परंपरा, जागतिक संवाद आणि आध्यात्मिक चेतनेचा एक असा जिवंत झंकार ठरला, ज्याने आधुनिक भारताच्या सांस्कृतिक इतिहासावर आपला एक अमीट ठसा उमटवला आहे. एक वर्षानंतरही हा सोहळा केवळ एका भव्य आयोजनासाठी नव्हे, तर त्याने जपलेल्या मूल्यांसाठी आणि जगाला दिलेल्या सांस्कृतिक संदेशासाठी स्मरणात राहील.
जागतिक राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज
भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची साक्ष देत, राजकारण आणि उद्योगजगतातील दिग्गजांनी आपली उपस्थिती लावली. या सोहळ्याने जागतिक मैत्री आणि सहकार्याचे एक नवे पर्व सुरू केले. विवाहाला उप्रमुख उपस्थितांमध्ये या मान्यवरांचा समावेश होता
जॉन केरी (अमेरिका), टोनी ब्लेअर (यु.के.), बोरिस जॉन्सन (यु.के.), मत्तेओ रेन्झी (इटली), सेबॅस्टियन कुर्झ (ऑस्ट्रिया), स्टीफन हार्पर (कॅनडा), कार्ल बिल्ट (स्वीडन), मोहम्मद नशीद (मालदीव), सॅमिया सुलुहु हसन (राष्ट्राध्यक्ष, टांझानिया); यांच्यासोबतच अडोबचे शंतनू नारायण, अरमाकोचे अमीन नासर, सॅमसंगचे जे ली आणि जीएसके, एचएसबीसी, बीपी, एरिक्सन, लॉकहीड मार्टीन, एचपी यांसारख्या अनेक जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांनी या सोहळ्याला उपस्थित राहून त्याच्या वैश्विक स्वरूपाला अधोरेखित केले.
सर्व पारंपरिक विधींनी उजळला सोहळा
हा विवाह सोहळा म्हणजे भारतीय परंपरा आणि उत्सवांचा एक जिवंत कोश होता.
विविध विधी : ‘मोसालू’ या गुजराती परंपरेपासून ते ‘गृहशांत’ पिठी/हळद, सप्तपदी आणि अग्निसाक्षी यांसारख्या मंगल विधींपर्यंत, प्रत्येक कार्यक्रमात संस्कृतीचे दर्शन घडले.
कला आणि संगीत : नीता अंबानी यांनी सादर केलेले ‘व्हॅली ऑफ गॉडस्’ हे भक्तिमय नृत्य आणि कुटुंबातील सदस्यांनी कला सादर केलेली संगीत संध्याकाळ अविस्मरणीय ठरली.
वाराणसीची अनुभूती : लग्नाच्या दिवशी सजावट थीम "An Ode to Banaras' (बनारसला अर्पण) अशी ठेवण्यात आली. हा जागतिक पाहुण्यांसाठी कायम आठवणीत राहणारा अनुभव ठरला. यामुळे पाहुण्यांना बनारसच्या घाटांमधून फिरल्याचा अनुभव मिळाला. प्राचीन शहर बनारसची परंपरा, भक्ती, संस्कृती, कला, हस्तकला यांची ओळख झाली. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जणू प्रतिवाराणसी अवतरली.
"Resplendently Indian' ड्रेसकोड : सोहळ्याच्या या ड्रेसकोडमुळे सर्व पाहुणे पारंपरिक भारतीय पोशाखात दिसले. विविध रंगांचे, शैलींचे आणि कलाकुसरीचे वस्त्र परिधान केलेले पाहुणे भारताच्या समृद्ध वस्त्र परंपरेचे इंद्रधनुष्यच भासत होते.
या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार असणारे संत महंत
स्वामी सदानंद सरस्वती शंकराचार्य द्वारका, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, शंकराचार्य जोशीमठ, गौरांग दास प्रभू, गौर गोपाल दास, राधानाथ स्वामी (ISKCON), पूज्य श्री रमेशभाई ओझा, गौतमभाई ओझा, पूज्य श्री देवप्रसाद महाराज, विजयबेन राजानी (आनंदबावा सेवा संस्था), श्री बालक योगेश्वरदासजी महाराज (बद्रीनाथ धाम), पूज्य चिदानंद सरस्वती (परमार्थ निकेतन), श्री नम्रामुनी महाराज, धीरेंद्रकुमार गर्ग (बागेश्वर धाम) बाबा रामदेव, स्वामी रामभद्राचार्य, स्वामी कैलासनंद (निरंजनी आखाडा), अवधेशनंद गिरी (जुना आखाडा), श्री देवकीनंदन ठाकुरजी महाराज, दीदी माँ साध्वी ऋतम्बरा (वात्सल्यग्राम), स्वामी परमात्मनंद (परम शक्ती पीठ), श्री विशाल राकेश गोस्वामी (श्रीनाथजी मंदिर). या संतमेळ्याने या विवाहाला केवळ एक सामाजिक सोहळा न ठेवता एक आध्यात्मिक यज्ञ बनवले.