स्पर्धा परीक्षा क्लासमधूनच फसवणुकीची सुरुवात
आयएएस प्रोटोकॉलसाठी मोठी रक्कम करत होत खर्च
बिहार विधानसभा निवडणूक काळात ९९ लाखांची रोकड जप्त प्रकरणी झाली होती अटक
fake IAS officer’s shocking crimes exposed
लखनौ : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पकडलेल्या एका बोगस आयएएस (IAS) अधिकारी गौरव कुमार सिंह उर्फ ललित किशोर याचे अत्यंत धक्कादायक कारनामे पोलीस तपासात समोर आले आहेत. कोचिंग क्लासमध्ये शिक्षक ते कोट्यवधी रुपयांचा फसवणुकीचा सूत्रधार हा त्याचा गुन्हेगारीतील प्रवास ऐकून पोलीसही सुन्न झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव कुमार सिंह उर्फ ललित किशोर हा मुळचा बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने २०१९ मध्ये गणितात एमएससी पदवी घेतली. यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. तीन वर्ष परीक्षाही दिल्या. त्यानंतर त्याने सीतामढी येथे 'आदित्य सुपर ५०' नावाचे कोचिंग क्लास सुरू केले. २०२२ मध्ये त्याने याच क्लासमधील एका विद्यार्थिनीला नोकरी देण्याच्या नावाखाली २ लाख घेतले, पण नोकरी मिळवून देऊ शकला नाही. पैसे परत न केल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर तो एक वर्ष अंडरग्राउंड राहिला.
कोचिंग क्लासच्या अध्यापनात फारसे मन रमले नाही. झटपट पैसा कमविण्याचे स्वप्न त्याल पडू लागली. बोगस आयएएस बनून रुबाब दाखवण्याचा आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा कट त्याने रचला. एकीकडे क्लासमध्ये शिकवत असताना दुसरीकडे आपला 'आयएएस प्रोटोकॉल' कायम ठेवण्यासाठी दर महिन्याला मोठी रक्कम खर्च करत असे. याच दरम्यान त्याने चार गर्लफ्रेंड्स बनवल्या. जेव्हा गौरव त्याच्या संपूर्ण ऐटीत बाहेर पडत असे, तेव्हा त्याच्यासोबत असणार्यांची संख्याही लक्षणीय असायची.
तो आपल्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीवर लाल-निळ्या दिव्यांच्या साहाय्याने गावांना भेटी देत असे. एकदा जेव्हा तो बिहारमधील भागलपूर गावात दौरा करण्यासाठी गेला होता, तेव्हा त्याची भेट एका खऱ्या एसडीएम अधिकाऱ्याशी झाली. त्या अधिकाऱ्याने गौरवच्या बॅच आणि रँकबद्दल चौकशी केली. यावर गौरव उर्फ ललित किशोरचे संतुलनच बिघडले. त्याने त्या अधिकाऱ्याला दोन थप्पड मारले. आश्चर्यकारक बाब म्हणजे, एसडीएमने याची तक्रारदेखील केली नाही.
गोरखपूर पोलिसांनी बिहार निवडणुकीदरम्यान ९९ लाख रुपांची रोकड पकडली होती. या चौकशीत बोगस आयएएस गौरव कुमार सिंह उर्फ ललित किशोर याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
गौरवला अटक केल्यानंतर पोलीस तपासात त्याचे अनेक कारनामे समोर आले. त्याला चार गर्लफ्रेंड्स आहेत, त्यापैकी तीन गर्भवती आहेत. त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने बनावट सरकारी कागदपत्रे बनवून मोठ्या व्यापाऱ्यांना सरकारी कंत्राटे मिळवून देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचेही उघड झाले. त्याने गोरखपूरच्या परमानंद गुप्ताला हाताशी धरून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये फसवणुकीचे मोठे जाळे पसरवले होते. पोलिसांनी त्याची कुंडली तपासली असता अनेक विस्मयकारक कृत्ये समोर आली.
भामटा गौरव हा उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बिल्डर आणि व्यावसायिकांना सरकारी कंत्राट व अन्य सरकारी व्यवसाय मिळवून देण्याचे आमिष दाखवत असे. AI-निर्मित बनावट कागदपत्रे पुरवून लोकांचा विश्वास संपादन करत असे. याच माध्यमातून त्याने कोट्यवधींची फसवणूक उकळले होते. त्याने एका व्यापाऱ्याला ४५० कोटी रुपयांचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून ५ कोटी आणि दोन इनोव्हा गाड्या लाच म्हणून घेतल्या होत्या. त्याने सॉफ्टवेअरचे शिक्षण घेतलेल्या त्याचा मेहुणा अभिषेक याच्या मदतीने आयएएसचे बोगस ओळखपत्र (ID) आणि नेमप्लेट बनवली होती, अशीही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
भूमिगत असताना त्याने एका मुलीसोबत प्रेमाचे नाटक केले. तिच्यासोबत पळून जाऊन मंदिरात लग्न केले. यानंतर त्याने मेहुणा अभिषेकच्या मदतीने लोकांना नोकरी आणि सरकारी कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने सोशल मीडियावर बोगस आयएएसचे प्रोफाइल तयार केले. मुलींशी मैत्री वाढवली. पोलिसांना त्याच्या मोबाइलमधून अनेक चॅट मिळाले आहेत. त्याची चार गर्लफ्रेंड्स असून, त्यापैकी तीन गर्भवती असल्याची माहिती मिळाली. या मुलींना गौरव विवाहित असल्याबद्दल काहीही माहीत नव्हते.
गोरखपूर पोलिसांनी याप्रकरणी सांगितले की, गौरव उर्फ ललित एका मोठ्या नेटवर्कमध्ये काम करत होता आणि तपासात नवीन तथ्ये समोर येण्याची अपेक्षा आहे. मोबाइल आणि कागदपत्रांतून अनेक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी त्याच्या फसवणुकीच्या संपूर्ण जाळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेश पोलिसांशीही संपर्क साधला आहे.