

इम्रान खान यांच्यावरील प्रश्न विचारला असता केले असभ्य वर्तन
सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल
चौधरींनी यापूर्वी भारताविरोधात केली आहेत आक्षेपार्ह विधाने
pakistan Army officer winks at journalist
इस्लामाबाद: पाकिस्तानचे लष्कर हे आपल्या कुरापतीखोरीमुळे जगप्रसिद्ध आहेच. भारताबरोबर थेट लढण्याची हिंमत नसणारे लष्कर, अशीही आपल्या देशात याची ओळख आहे. आता पाकिस्तान लष्करातील अधिकारी किती वाह्यात आहेत, याची प्रचिती नुकतीच एका पत्रकार परिषदेत आली. पाकिस्तानच्या आंतर-सेवा सार्वजनिक संबंधांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी एका महिला पत्रकाराला डोळा मारला. अधिकाऱ्याच्या असभ्य वर्तनामुळे पाकिस्तान लष्कराच्या अब्रूचे धिंडवडे पुन्हा एकदा जगासमोर निघाले आहेत.
पत्रकार परिषदेमध्ये एका महिला पत्रकाराने लेफ्टनंट जनरल चौधरी यांना तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील आरोपांवर प्रश्न विचारला. यावर इम्रान खान हे "राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका", "राज्यविरोधी" असून "दिल्लीच्या हातात खेळत" असल्याचा आरोप चौधरी यांनी केला. कोमल यांनी विचारले, " आपण केलेले आरोप पूर्वीपेक्षा वेगळे कसे आहेत?" असा सवालही त्यांनी केला. यावर चौधरी यांनी उपहासाने उत्तर दिले, "आणि चौथा मुद्दा जोडा ते 'मानसिक रुग्ण देखील आहेत." त्यानंतर ते हसले आणि त्यांनी प्रश्न विचारणार्या महिला पत्रकाराला डोळा मारला. पाकिस्तानमधील सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र याबाबत पाकिस्तान लष्कराने कोणताही खुलासा केलेला नाही.
पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर एका युजरने म्हटले आहे की, "हे व्यावसायिक सैनिक नाहीत." तर एका युजरने आपला संताप व्यक्त करत, "अशा घटनेवरून त्यांचे सैन्य किती अव्यावसायिक आहे हे दिसून येते. गणवेशातील कोणीतरी सार्वजनिकरित्या अशा प्रकारे डोळा कसा मारू शकतो?" असा सवाल करत "ते पाकिस्तान लष्कराचे जनरल आहेत... ते ज्या परिस्थितीत आहेत त्याचे आश्चर्य नाही," असा टोलाही लगावला आहे.
लेफ्टनंट जनरल चौधरी मागील काही दिवसांमध्ये पाकिस्तान लष्कराचा एक महत्त्वाचा चेहरा बनले आहेत. त्यांनी वारंवार भारताविरोधात विधाने केली आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यावेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते चर्चेत आले होते. लेफ्टनंट जनरल चौधरी हे सुलतान बशीरउद्दीन महमूद यांचे पुत्र आहेत. आता हे सुलतान बशीरउद्दीन महमूद घोषित दहशतवादी आणि ओसामा बिन लादेन यांचे साथीदार मानले जातात. मागील आठवड्यात याच चौधरींनी इम्रान खान यांना मानसिक रुग्ण म्हटले होते. तसेच ते राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचेही म्हटले होते.