

गावात मुल जन्मलेले किंवा लग्नाच्या कार्यक्रमात ट्रान्सजेंडरची हजेरी
२१,००० ते ५१,००० रुपयांची केली जात होती मागणी
पैसे देण्यास नकार दिल्यास महिला आणि मुलांसमोर पुरुषांशी असभ्य वर्तनाचे प्रकार
लखनौ : ट्रान्सजेंडर (किन्नर/तृतीयपंथी) तुम्हाला रेल्वे किंवा रस्त्यावर पैसे मागताना दिसतात. यांचा मूलभूत मानवी हक्कांसाठी आणि सन्मानाने जगण्यासाठीचा संघर्ष आजही कायम आहे. त्यामुळेच उत्तरेतील राज्यांमध्ये सार्वजनिक समारंभात (उदा. मूल जन्मल्यास किंवा लग्न झाल्यास) किन्नरने पैसे मागण्याची कृती ही परंपरा नसून, त्यांच्या अगतिकतेचाच परिणाम आहे. मात्र जेव्हा ट्रान्सजेंडर व्यक्ती पैसे मागण्यासाठी घाबरून किंवा त्यांच्या शापाच्या भीती दाखवून हजारो रुपये उकळू लागतात तेव्हा याची दखल घ्यावीच लागते. अशीच दखल घेतली आहे उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील मुबारकपूर गावाने. येथील ग्रामपंचायतीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, किन्नरांना 'नेग' (शुभ भेट) म्हणून ११०० रुपयेच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रकमेवर त्यांनी समाधान न मानता जबरदस्ती केल्यास किंवा गैरवर्तन केल्यापोलिसांना बोलावले जाईल, असा ठराव मुबारकपूर ग्रामपंचायतीमध्ये मंजूर झाला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून किन्नरांच्या वर्तनाने मुबारकपूर ग्रामस्थ कमालीचे त्रस्त होते. कोणाच्या घरी शुभ कार्य किंवा मुलगा जन्माचा सोहळा असायचा, तेव्हा हे किन्नर उपस्थित राहून २१ हजार ते थेट ५१ हजार रुपयांपर्यंतच्या मोठ्या रकमेची मागणी करत होते.
मानसिक छळ: एवढी मोठी रक्कम देणे सामान्य कुटुंबांना शक्य होत नसे. पैसे न मिळाल्यास हे किन्नर कुटुंबातील महिला आणि लहान मुलांसमोरच घरच्या पुरुषांचा आणि प्रमुखांचा अपमान करत असत. तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करत असत. यामुळे ग्रामस्थांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
मुबारकपूर गावातील लोक पूर्वी आनंदाने आपल्या आर्थिक कुवतीनुसार आनंदाच्या प्रसंगी तृतीयपंथीयांना 'नेग' (शुभ भेट) देत असत; पण मागील काही काळात तृतीयपंथीयांनी या प्रथेचे व्यवसायीकरण केले असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला आहे.
तृतीयपंथीयांच्या मानसिक छळाला कंटाळून गावात ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सभा घेण्यात आली. सरपंच गोपाल सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ग्रामस्थांनी तृतीयपंथीयांकडून होणार्या त्रासाची माहिती दिली. एका ग्रामस्थाने सांगितले की, "माझा मुलगा आजारी होता. आम्ही औषधांसाठी पैशांची जमवाजमव करत असतानाच किन्नर आले आणि त्यांनी पैशांची जबरदस्ती करून असभ्य वर्तन केले." यानंतर ग्रामपंचायतीमध्ये एकमताने ठराव झाला की, गावात मुलगा जन्माला आल्यावर किंवा शुभ कार्य झाल्यावर नेग म्हणून फक्त ११०० रुपये दिले जातील. यावर समाधान न मानणाऱ्या, पैशांसाठी दबाव आणणाऱ्या किंवा गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही किन्नरावर संपूर्ण गाव एकजुटीने पोलिसांना बोलावून कारवाई करेल.
गावातील शुभ कार्यावे तृतीयपंथीय आले तर त्यांना ११०० रुपयेच दिले जातील, असा निर्णय मुबारकपूर ग्रामपंचायतीने घेतला. यानंतर तत्काळ या निर्णयचा माहिती गंगोह पोलीस ठाण्यात दिली. येथील पोलीस अधिकार्यांनी ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यापुढे तृतीयपंथीय अतिरिक्त पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.