

indigo flights cut by 10 percent
नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पीटर एल्बर्स यांना मंगळवारी नागरिक उड्डयन मंत्रालयाच्या (MoCA) मुख्यालयात बोलावण्यात आले होते. या महत्त्वाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू आणि सचिव समीर सिन्हा यांनी इंडिगोच्या 'ऑपरेशन्स' (संचालन), प्रवासी सेवा, तिकिटांचा परतावा (रिफंड) आणि सामानाची (बॅगेज) स्थिती यावर सविस्तर चर्चा केली. दरम्यान, केंद्राने कठोर भूमिका घेत कंपनीला उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी इंडिगोच्या एकूण 'ऑपरेशन्स'मध्ये १० टक्क्यांची कपात करण्याचे आदेश दिले आहेत.
परिचालनामध्ये (ऑपरेशनल) आलेल्या मोठ्या संकटानंतर इंडिगोने आता सर्व विमानांची उड्डाणे पूर्ववत झाली असून १८०० हून अधिक विमानांचे संचालन करत असल्याची माहिती यावेळी दिली. मात्र, केंद्राने कठोर भूमिका घेत कंपनीला उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी इंडिगोच्या एकूण 'ऑपरेशन्स'मध्ये १० टक्क्यांची कपात करण्याचे आदेश दिले आहेत.
सूत्रांनुसार, नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू आणि सचिव समीर सिन्हा यांच्यासह झालेल्या बैठकीत इंडिगोच्या संचालन स्थितीसह प्रवाशांची काळजी, परताव्याची स्थिती, पायलट आणि केबिन क्रूची (कर्मचारी) उपलब्धता तसेच सामानाची परतीची स्थिती यावर प्रामुख्याने चर्चा झाली.
मंत्री राम मोहन नायडू यांच्यासोबतच्या भेटीपूर्वी इंडिगोने मंगळवारी एक निवेदन जारी केले. एका आठवड्याहून अधिक काळ चाललेल्या परिचालन संकटानंतर आता सर्व उड्डाणे सामान्यपणे सुरू झाली आहेत. कंपनीचा 'ऑन-टाइम परफॉर्मन्स' (वेळेवर उड्डाण करण्याची कामगिरी) पूर्ववत झाला असून, बुधवारी सुमारे १९०० विमानांचे संचालन करण्याचे नियोजन असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.कंपनीच्या अधिकृत निवेदनानुसार, नेटवर्कमध्ये सुधारणा झाल्यानंतर सर्व नियोजित उड्डाणे ऑपरेट होतील. विमानतळांवर अडकलेले जवळपास सर्व सामान आता ग्राहकांपर्यंत पोहोचले आहे आणि राहिलेले सामानही लवकरच वितरित केले जाईल. सध्या इंडिगो देशभरातील १३८ स्थानकांवर १८०० हून अधिक विमानांचे संचालन करत आहे. तसेच, रद्द झालेल्या तिकिटांवरील पूर्ण परताव्याची प्रक्रिया (फुल रिफंड) ग्राहकांसाठी कंपनीच्या वेबसाइटवर सोपी आणि स्वयंचलित (Automated) केली गेली आहे, असा दावाही कंपनीने केला.
मीटिंगपूर्वी इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितले की, एअरलाइन आता पूर्णपणे स्थिर झाली आहे आणि सर्व मार्गांवर उड्डाणे सुरळीत सुरू आहेत. ५ डिसेंबर रोजी हे संकट सुरू झाले तेव्हा फक्त ७०० विमानांची उड्डाणे होऊ शकली होती, त्याबद्दल त्यांनी ग्राहकांची दिलगिरी व्यक्त केली.
दरम्यान, लोकसभेत नागरिक उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केले की, इंडिगोला फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांमध्ये कोणतीही विशेष सूट दिली जाणार नाही. ते म्हणाले की, "कोणतीही एअरलाइन, ती कितीही मोठी असली तरी, अशा प्रकारे प्रवाशांना त्रास देऊ शकत नाही." देशांतर्गत विमान वाहतूक बाजारात इंडिगोचा बाजार हिस्सा सुमारे ६५ टक्के असल्याने, त्यांनी नवीन कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची गरजही व्यक्त केली.