

संसर्गाच्या वाढीस मर्यादित जन-जागृती कारणीभूत
दर महिन्याला ४० ते ६० नवीन प्रकरणांची नोंद
सामाजिक कारणांसह एचआयव्ही तपासणी अनिच्छेचाही ठरतीय कारणीभूत
स्थानिक आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण
HIV Cases In Bihar
पाटणा: बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात 7,400 हून अधिक लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले असून, त्यापैकी 400 हून अधिक मुलांना संसर्ग झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयातील एआरटी केंद्राच्या आकडेवारीनुसार, ४०० हून अधिक मुलांना त्यांच्या पालकांकडून या विषाणूचा संसर्ग झाला आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर एचआयव्ही पॉजिटिव्ह रु्ग्ण आढल्याने जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी बहुतांश प्रकरणे अशा कुटुंबांमधील आहेत जिथे एक किंवा दोन्ही पालक एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. प्रसूतीच्या वेळी बालकांना संसर्ग झाला. रिपोर्टनुसार, एआरटी केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या स्थितीला 'अत्यंत चिंताजनक' म्हटले आहे आणि संसर्गाच्या या वाढीस मर्यादित जन-जागृती कारणीभूत असल्याचे सांगितले आहे.
केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हसीन अख्तर यांनी माहिती दिली की, वारंवार मोहीम राबवूनही जागृतीचे प्रमाण 'अत्यंत कमी' राहिले आहे. त्यांनी नमूद केले की, केंद्रात दर महिन्याला ४० ते ६० नवीन प्रकरणांची नोंद होते आणि सध्या सुमारे ५,००० रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. सीतामढी आता एचआयव्हीचा 'हाय-लोड सेंटर' बनला आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे."
वैद्यकीय अधिकार्यांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण वाढीसाठी अनेक सामाजिक घटक कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. लग्नापूर्वी आरोग्य तपासणी न करणे, कामासाठी मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर, एचआयव्ही संसर्गाबद्दलची कमी माहिती आणि सामाजिक कलंकामुळे तपासणी करण्यास लोकांमध्ये असलेली मोठी अनिच्छा यांचा समावेश आहे.
एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने आता संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. एआरटी केंद्र नवीन सामुदायिक संपर्क मोहीम आखत आहे. आरोग्य पथके स्थानिक गावांमध्ये एचआयव्ही तपासणी शिबिरे आयोजित करण्याच्या तयारीत आहेत.
सीतामढीमधील वाढत्या एचआयव्ही पॉझिटिव्ह वाढत्या संसर्ग हा जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी एक गंभीर आरोग्य धोक्याची सूचना म्हणून पाहिले पाहिजे. पुढील प्रसार रोखण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध, दूषित सुयांचे धोके आणि नियमित एचआयव्ही तपासणीची आवश्यकता याबद्दल वेळेवर जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करत व्यापक सार्वजनिक शिक्षण आणि सातत्यपूर्ण तपासणीशिवाय सीतामढीतील वाढती एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पुढील महिन्यांत आणखी भयावहरित्या वाढेल, असा इशाराही वैद्यकीय अधिकार्यांनी दिला आहे.