बोरी; पुढारी वृत्तसेवा: गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे बोरी व परिसरातील बोरी, कौसडी, मुडा, वर्णा, निवळी, माक, कोक, गणपुर ,वाघी, पिंपळगाव, कान्हड, रिडज, नागापूर, बोर्डिं, करवली आदी गाव परिसरातील सोयाबीनचे दहा हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
यावर्षी सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यामुळे पिके जोमात आली होती. त्यामुळे शेतकरी आनंदित होता. परंतु, सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसास सुरूवात झाली. यामुळे बोरी परिसरातील बोरी, कौसडी, मुडा, वर्णा, निवळी आणि करवली आदी गावातील सोयाबीनचे दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली. यात सोयाबीन पिकांचे माेठे नुकसान झाले आहे.
बोरी परिसरात सोयाबीनची पेरणी ७० टक्के पुर्ण झाली असून सोयाबीन पिक हे नगदी म्हणून ओळखली जाते. या दरम्यान सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाकडून कोणतेही पॅकेज अद्यापही जाहीर न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाचा विमा भरून सुद्धा नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर दिसत आहे.
शासनाकडे पाठपुरवठा करून सुद्धा मंत्री नुसते पंचनाम्याचे केवळ आदेश देत आहेत.
आर्थिक चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शेतातील पिकांचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
अनेक शेतांमध्ये सोयाबीन पिकांच्यावर पाणी साचल्यामुळे सोयाबीनचे खूपच नुकसान झाले आहे.
तसेच सोयाबीनच्या उभ्या पिकांना कोंब फुटताना दिसत आहेत.
हेही वाचलंत का?