विदर्भ

चंद्रपूर : चवताळलेल्या वाघाचा जमावावर हल्ला ; दोघे जण गंभीर जखमी

मोनिका क्षीरसागर

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :
गेल्या आठवड्यापासून गोंडपिपरी तालुक्यात वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्‍याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करताना चवताळलेल्या वाघाने जमावावर हल्ला केला. यामध्‍ये दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. १४) तोहोगाव परिसरात घडली. राजुरा येथील सुरेश मत्ते व तोहोगाव येथील शरद बोपणवार हे गंभीर जखमी झाले आहेत. वाघाला तात्काळ जेरबंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

मागील आठवड्यापासून गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव, आर्वी, वेजगाव परिसरात वाघाने गावालगतच धुमाकूळ घातला आहे. याच वाघाने गेल्या काही दिवसांपासून पाच बैल, शेळ्या, म्हैस या पाळीव प्राण्यांना ठार केले आहे. वाघाची दहशत असल्याने नागरिक रात्रं-दिवस जागून काढत आहेत. परिसरात पोलिस व वनकर्मचारी संयुक्त गस्त घालत आहेत; परंतु वनविभागाने वाघाला जेरबंद करण्याची मोहीम गंभीरपणे घेतलेली नाही. केवळ देखावा म्हणून एक पिंजरा आणि काही मोजके ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत, असा आराेप स्‍थानिक नागरिकांकडून हाेत आहे.

गुरुवारी (दि.१४) सकाळी अकराचे सुमारास तोहोगाव-आर्वी मार्गावरील नाल्यालगतच्या झुडपात वाघ लपून बसल्याची माहिती परिसरात पसरली.  यावेळी  काही नागरिकांनी वाघाला हुसकावण्‍याचा प्रयत्‍न केला. वन कर्मचाऱ्यांनी त्‍यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु काही नागरिक वाघाला हुसकावून लावण्यासाठी दगड मारू लागले. त्यामुळे वाघ चवताळला. त्याने जमावाच्या दिशेने हल्ला चढविला. नागरिकांची धावाधाव सुरू झाली. तोहोगाव येथील शरद बोपणवार आणि विरुर स्टेशन येथील सुरेश मत्ते गंभीर जखमी केले. त्‍यांना तोहोगाव आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

वाघाला तात्काळ जेरबंद करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वेजगाव येथील माजी सरपंच नरेंद्र वाघाडे, तोहोगाव येथील माजी उपसरपंच फिरोज पठाण आणि परिसरातील नागरिकांनी दिला आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक स्वेता बोड्डू घटनास्थळी पोहचले. येथे आणखी पिंजरे लावण्यात येत असून, नागपूर व चंद्रपूर येथील विशेष पथक लवकरच येऊन पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT