‘अगं ऐक ना, मी त्या अमुकतमुक ॲपवरून किराणा मागवला ना आज, तर सगळ्या वस्तूंवर सिलिंग आलंय. कोणतीही वस्तू फक्त एकच पाकीट मिळतेय. ही येऊ घातलेली अन्न टंचाई तर नसेल?’ मैत्रिणीचा घाबऱ्या घाबऱ्या फोन आला... झालं! जगात सुरू असलेल्या कोणत्याही घडामोडींमुळे घरात बसून पॅनिक होण्याच्या आम्हां बायकांच्या वैश्विक स्वभावाला जागत, मला नाही म्हटलं तरी थोडसं घाबरायला झालंच.
अनु-भवताल
ज्योती मुळ्ये
मैत्रिणीने केलेल्या एका फोनमुळे कुणाला सांगू नकोस हं, च्या बोलीवर पुढच्या काही वेळात आमच्या मैत्री वर्तुळात, कौटुंबिक वर्तुळात, सोसायटीत, जमलंच तर आपापल्या नवऱ्यांच्या ऑफिसेसमध्ये, त्यांच्या आपापल्या बसेस/ ट्रेन्समध्ये, बघावं तिकडे अगदी थोडक्या वेळात त्या युद्ध फिव्हरची भसाभस लागण झालीच! एकवेळ खराखुरा फिव्हर चटकन उतरेल पण आम्हा बायकांचा फॅमिली प्रोटेक्शन अँटीना एकदा का ॲक्टिव झाला, की त्यातला स्टॉक सिंड्रोम कधीही आटत नाही.
मुळात आम्हाला सवयच असते, प्रत्येक गोष्टीचा स्टॉक करून ठेवायची. न जाणो उद्यापासून मिळायचं बंदच झालं तर? घरात सगळं पुरेसं असायला हवं, कशाची ददात नाही पडता कामा, या भावनेतून, खरंतर आम्ही बायका वर्षानुवर्षं कित्येक गोष्टींचा स्टॉक करतच असतो. हे पाहता मागचा तो कोरोना, आत्ताची ही युद्धजन्य परिस्थिती हे तर आम्हांला प्रलयाची भीती घालणारे ब्रह्मराक्षसच! मैत्रिणीने कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून केलेल्या ‘अलर्ट कॉल’ ने आपलं काम चोख केलं! आता ती युद्ध परिस्थिती दाराशी फाटकन येऊन ठेपलेली आहे, कोणत्याही क्षणी खळ्यात मिसाईल पडेल याचा मला क्षणात अंदाज आला.
युद्धाचं पहिलं रणशिंग फुंकण्यासाठी मी पहिला फोन फिरवला आमच्या तीर्थरूपांच्या शेंडेफळाला! घरातल्या वडीलधाऱ्यांकडून त्यांच्या काळी पडलेल्या दुष्काळातल्या ‘डुकरी आणि मिलो’च्या कथा ऐकून जोरदार फोमो झालेल्या आम्हा दोघींची युद्धजन्य परिस्थिती उद्भवणे’ ही ऑल टाईम फेवरेट फॅन्टसी आहे. युद्धजन्य परिस्थिती आली की आपण घरात तांदळाच्या गोणी आणि मिठाच्या फरी भरायच्या आणि माझ्या घराच्या कंपाऊंडात बंकर खोदून त्यात मऊ भात खाऊन लपून राहायचं असे प्लॅन्स आम्ही दोघींनी वर्षानुवर्षं शिजवलेत. त्यामुळे कुठलीही कठीण परिस्थिती आली की तांदळाच्या गोणी आणि मिठाच्या फरी हा आमचा स्विच वर्ड आहे.! तो आला की आम्ही ट्रम्पच्या वरताण प्लॅनिंग करतो. युद्ध परिस्थिती येऊन ठेपलीय म्हटल्यावर आम्ही दोघी सॉलिड एक्साईट झालो. गावगप्पांचं वारं लक्षात घेता आम्ही पहिला मोर्चा वळवला, गॅस सिलिंडरकडे! ऑनलाईन बुकिंगचा पर्याय उपलब्ध असूनही,
सध्याच्या तळपणाऱ्या कडकडीत उन्हाची पर्वा न करता तिचा आणि माझा नवरा असे दोन्ही साडू गॅस एजन्सीच्या दारात उभे ठेवून आम्ही किराण्याची तजवीज करायला घेतली.. पण हाय रे देवा! डी मार्टमध्ये इतकी तुंबळ गर्दी होती की युद्धभूमी परवडली, अख्ख्या शहराला धान्य पुरवठा करायचा असल्याप्रमाणे सगळेजण भसाभस धान्य ओतून घेत होते. आता आम्ही मागे हटून चाललं नसतं. आम्हीही बाह्या सरसावून स्वतःला त्या रणसंग्रामात लोटून दिलं. काही तासांत ढीगभर साबण, डाळी, तेलं, धान्य, कडधान्य यांनी ट्रॉल्या ओसंडून वाहू लागल्या. त्यांच्या जोडीला आणखी ट्रॉल्या आणून त्यात लग्झरी आयटम्स ओरपले. जास्तीत जास्त माल लुटण्यासाठी जनतेच्या त्या अहमहमिकेत तसूभरदेखील मागे न राहता आम्हीही आमच्या चारचाक्यांच्या डिक्या गुदमरेस्तो माल लुटला. ‘जिंकू किंवा मरू’ या ईर्ष्येने डी मार्टच्या रणसंग्रामात उतरलेल्या या दोन रणरागिणी अखेर चार तासांच्या अथक परिश्रमानंतर सुरतेची लूट केल्याच्या थाटात घरी दाखल झाल्या.
पाहिलं तर दोन्ही नवरे संगनमताने आमच्या घरी सोफ्यावर पसरून टीव्हीवर लावलेली मॅच एन्जॉय करत होते. ‘ह्याँ! सिलिंडर कुठाय?’ या अर्थी वटारलेले चार डोळे पाहताच मेव्हण्याने सावरून बसत लगबगीने सांगितले, सिलिंडर 45 दिवसांनी मिळणारे! येईल घरी!’ अँ ! तोपर्यंत आणलेला किराणा काय कच्चा वाढू का पानात? कश्शाला? मस्त चूल पेटवू आणि जेवण करू. एकदम गावरान चुलीवरच्या जेवणाचा फील. मी तर मित्रांनाही मेसेज टाकलाय, उद्यापासून आमच्याकडे चुलीवरचं जेवायला या म्हणून! आमचं पात्र नेहमीप्रमाणे नको तिथे पचकलं.
डी मार्टमधल्या चार तासांच्या परिश्रमाने दमलेल्या व सिलिंडर न आणता नवऱ्यांवर संतापलेल्या दोन बहिणी आता आल्या पावली परत फिरल्यायत. त्या दोघांसाठी दोन फुंकण्या आणि काडेपेट्या आणायला! त्यांना पाठवलंय लाकूडफाटा, शेणी गोळा करायला. दोघीही देवाकडे मनोमन प्रार्थना करतोय, अनायासे युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे तर फुका चुली आणि उठवा चुलीवरच्या जेवणाच्या पंगती!