Sunetra Pawar: राजकारणात स्थिरावताहेत सुनेत्रा पवार!
मृणालिनी नानिवडेकर, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर मुख्यमंत्रिपद तर दूरच, पण उपमुख्यमंत्रिपदावरही एकाही महिलेला काम करायची संधी मिळाली नव्हती. पुरोगामी महाराष्ट्रात जीवनाच्या सर्व क्षेत्रांत महिला झपाट्याने समोर येत आहेत खऱ्या; पण राजकीय नेतृत्वाबाबत कोणीही सर्वोच्च पदावर पोहोचलेले नव्हते. मात्र, अत्यंत दुःखद परिस्थितीत पतीच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. सुमारे महिना झाल्यानंतर ही जबाबदारी त्या समजून घेत प्रगल्भपणे सत्ताकारणात स्थिरावत आहेत.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने सुनेत्रा यांचा कामकाजात सहभाग व कार्यक्रमातील वावर प्रकाशझोतात येत आहे. विधिमंडळातील चर्चेला विधान परिषदेत उत्तर देताना त्यांनी ‘महिलांनी कामावर लवकर यावे आणि लवकर जावे’ अशा प्रकारचा प्रस्ताव मांडून आपण वेगळा विचार करू शकतो, याची चुणूक दाखवली आहे.
नोकरदार महिलांसाठी अशा पद्धतीचा विचार राज्यकर्त्या महिलेने करणे हे एक वेगळेपण आहे. मी दररोज काहीतरी नवीन शिकते आहे, राजकारण बाहेरून पाहिले, पण आता आतून पाहते आहे. दोन्हीत बराच फरक आहे, अशी प्रांजळ कबुली सुनेत्रा पवार यांनी अनौपचारिकपणे दिली.
महिला शेतकऱ्यांसाठी विधिमंडळात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हाही सुनेत्रा अत्यंत प्रगल्भपणे शेतीचे प्रश्न समजून घेऊन बोलल्या. त्यानंतर कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी त्यांनी अजितदादांचा वारसा पुढे चालवणार, असे विधान केले. पतीच्या निधनाची चौकशी करण्यासाठी त्या पक्षातील सहकारी आमदारांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीलाही गेल्या.
दादांच्या मृत्यूचा मुद्दा विधिमंडळात चर्चेला घ्यावा, ही मागणी पुढच्या आठवड्यात विधिमंडळात पुन्हा एकदा धसास लावण्याचा प्रयत्न केला जाईल. अशावेळी सरकारचा भाग झालेल्या सुनेत्रा पवार यांना पक्ष, पतीचा वारसा आणि सरकार या तिन्ही भूमिका सांभाळण्याची कसरत करावी लागेल.

