Thane, Kalyan Harassment Case
कल्याणच्या आडीवली-ढोकळी परिसरात पती, सासूच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपविले Pudhari News Network
ठाणे

Thane News| तू काळी...तुझे ओठ काळे...: पोलीस पतीच्या टोमण्यांना वैतागून नवविवाहितेने जीवन संपविले

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या आडीवली-ढोकळी भागात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जागृती बारी या २४ वर्षीय नवविवाहितेला टोकाचे पाऊल उचलावे लागले. पती आणि सासूकडून मारल्या जाणाऱ्या टोमण्यांना वैतागून जागृतीने गळफास लावून स्वतःला संपविले. त्यापूर्वी जागृतीने तिच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट लिहून ठेवल्याने तिची सासू आणि पती या दोघांना जबाबदार ठरवून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Summary

  • आडीवली-ढोकळी भागात धक्कादायक प्रकार समोर

  • तू काळी...तुझे ओठ काळे...तोंडाचा वास येतो

  • पती, सासूच्या टोमण्यांना वैतागून टोकाचे पाऊल

  • २४ वर्षीय नवविवाहितेने जीवन संपविले

पती, सासूला 11 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

सासू शोभा ( वय ६०) आणि जागृतीचा पती सागर रामलाल बारी (वय ३२) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. या माय-लेकाला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने अधिक चौकशीसाठी त्यांना 11 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सागर हा मुंबईतील आजादनगर पोलिस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

20 एप्रिलरोजी मोठ्या थाटात विवाह

या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील कुऱ्हेपानाचे येथील गजानन भिका वराडे यांनी त्यांची कन्या जागृती हीचा विवाह जळगावमधील पिंप्राळामधील सागर रामलाल बारी याच्याशी दोन महिन्यांपूर्वी 20 एप्रिल रोजी मोठ्या थाटात लावून दिला. लग्नात वर मुलगा सागर याला 14 ग्रॅमची सोन्याची चेन, 6 ग्रॅमची सोन्याची अंगठी देण्यात आल्याची माहिती मृत जागृतीचे वडील गजानन वराडे यांनी दिली.

मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाखांची मागणी

हा मुंबई पोलिस दलात असल्याने विवाहानंतर जागृती 21 जूनला कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या आडीवली-ढोकळी परिसरामध्ये पतीसह राहायला जाणार असल्याने तिचे आई-वडील पिंप्राळा गावात भेटायला गेले. जागृतीचे आई-वडील भेटायला आले, तेव्हा तिची सासू शोभा बारी हिने लग्नात हुंडा दिला नाही, अशी कुरकुर केली होती. तसेच मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाख रूपये द्या, अशी मागणी केल्याचा आरोप वराडे कुटुंबाने केला आहे. शेतीमध्ये पैसा लागलेला आहे. त्यामुळे सद्या पैसे नाहीत. मी तुम्हाला थोडीफार रक्कम देईन, असे आम्ही सांगितले. त्यानंतर मुलगी मुंबईमध्ये रहायला गेल्याची माहिती वराडे कुटुंबाने प्रसारमाध्यांना दिली.

बेडरूमच्या सिलिंग फॅनला गळफास

5 जुलैला सागर याने जागृतीचा भाऊ विशालला फोन केला. तुझ्या बहिणीने घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे सांगून फोन कट केला. हे ऐकून जागृतीचा भाऊ, आई, वडीलांच्या पायाखालची जमीनच सरकली. या साऱ्यांनी कल्याणकडे धाव घेतली. मृत जागृतीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. घर घेण्यासाठी 10 लाखांचा हुंडा मागितला, शारिरिक आणि मानसिक छळ केला, म्हणून आपल्या कन्येने टोकाचा मार्ग पत्करला. याला कारणीभूत ठरलेल्या जागृतीचा पती सागर आणि सासू शोभा बारी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

जागृतीच्या बोलण्यातून आईचा गौप्यस्फोट

मुलीचे आपल्याशी शेवटचे काय बोलणे झाले ? याचा जागृतीच्या आईने धक्कादायक गौप्यस्फोट केला. माझी सासू मला तू काळी आहेस...तुझे ओठ काळे आहेत...तोंडाचा घाण वास येतो...अशा शब्दांत हिणवून तू माझ्या मुलाला पसंत नाहीस, घरातून निघून जा, नाहीतर घर घेण्यासाठी आईकडून 10 लाख रूपये घेऊन ये, अशीही दमदाटी केली जायची. माझा शारिरिक आणि मानसिक छळ करते, तू त्यांच्याशी बोलून घे, असे आपल्याला फोनवर मुलीने बोलल्याचे जागृतीच्या आईने सांगितले. जागृतीचा पती सागर हा मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत आहे. सागर आई सोबत कल्याण जवळच्या आडीवली-ढोकळीत राहत आहे. पोलिस असल्यामुळे त्याने अप्रत्यक्षरित्या कायदा हातात घेतल्याचा आरोप जागृतीच्या नातलगांनी केला आहे.

अवघ्या 13 दिवसांतच उचलले टोकाचे पाऊल

गावाहून कल्याणात आल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्येच जागृतीने 5 जुलै रोजी टोकाचे पाऊल उचलले. त्याआधी तिने मोबाईलमध्ये सुसाईट नोट लिहिली. मात्र मोबाईल लॉक असल्यामुळे तो ओपन करता आला नाही. पोलिसांनी जागृतीचा मोबाईल ताब्यात घेतला. जागृतीच्या बहिणीने लॉक पॅटर्न सांगितल्यानंतर पोलिसांच्या हाती सुसाईड नोट लागली. याच सुसाईड नोटच्या आधारे जागृतीने सासू आणि पतीला जबाबदार धरल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी जागृतीचा पती सागर आणि सासू शोभा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

सासू आणि पतीवर कठोर कारवाईची मागणी

सासू गहू आणण्यासाठी बाहेर गेली. तेव्हा जागृतीने बाहेरून दाराला कुलूप लावले. त्यानंतर जागृती पाण्याच्या ड्रमवर चढून फॅनखाली उभी राहिली आणि ओढणीच्या साह्याने तिने गळफास लावून घेतला. आमच्या मुलीला टोकाचे पाऊल उचलायला प्रवृत्त करणाऱ्या तिच्या सासू आणि पतीवर कठोर कारवाई व्हावी. त्या दोघांना शिक्षा झाल्याशिवाय आमच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, अशी भावना मृत जागृतीच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

SCROLL FOR NEXT