

डोंबिवली : कल्याणमरूये एका श्वानप्रेमी महिलेला एकाने श्वानांच्या त्रासावरून मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आहे. गेल्या आठवड्यात एका कल्याणकराच्या कारवर श्रानाने लघुशंका केल्याने कारचा मालक आणि श्वान मालक यांच्यात वाद होऊन प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले होते. गेल्या काही दिवसांपासून पाळीव आणि मोकाट श्वानांच्या तक्रारी पोलिस ठाण्यापर्यंत येऊ लागल्याने आता माणसांच्या तक्रारींचा तपास करायचा की श्वानांच्या प्रकरणांना प्राधान्य द्यायचे? असे प्रश्न पोलिसांना पडले आहेत.
पूनम अक्षय भोई (रा. निलगिरी सोसायटी, कल्याण-पश्चिम) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. तर अकरम मुश्ताक शेख असे आरोपीचे नाव असून तो पूनम राहत असलेल्या सोसायटीत राहतो. पूनम आणि तिचे पती अक्षय हे दोघे श्वानप्रेमी आहेत. पाळीव आणि भटक्या श्वानांना ते नेहमी भांड्यात पाणी आणि थाळीत जेवण ठेऊन सोसायटीच्या आवारात मोकळ्या जागेत खाऊ घालतात. गेल्या आठवड्यात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पूनम आणि तिचे पती अक्षय नेहमीप्रमाणे एका थाळीत जेवण ठेऊन ते भटक्या व पाळीव श्वानांना खाऊ घालण्यासाठी सोसायटी आवारात फिरत होते.
त्यांनी सोसायटीच्या एका मोकळ्या जागेत अन्नाची थाळी ठेवली होती. तोपर्यंत भटकी श्वान तेथे आली नाहीत. बराच उशीरा वाट पाहनही भटकी श्वान येत नसल्याने भोई दाम्पत्य सोसायटीच्या आवारात उभे होते. याच दरम्यान पाऊस सुरू झाला. थाळीत श्वानांसाठी ठेवलेले जेवण खराब होऊ नये म्हणून पूनम यांनी जेवणाची थाळी उचलून ती सोसायटीच्या जिन्याजवळ आणून ठेवली, हा प्रकार या सोसायटीत राहणाऱ्या अकरम शेख याने पाहिला. त्याने जिन्याजवळ भोजनाची थाळी ठेवण्यास विरोध केला, अशाप्रकारे रस्त्यात अशी थाळी ठेवायची नाही, अशी बडबड करून पूनम आणि त्यांच्या पतीला असा प्रकार पुन्हा केल्यास थेट मारण्याची धमकी दिली आहे.