पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व लाभार्थ्यांना पहिला डोस लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्या दिशेने लसीकरण विभागाची वाटचाल सुरू असून डिसेंबरअखेर, म्हणजेच येत्या 20 ते 22 दिवसांत राज्यातील 100 टक्के जनतेला पहिला डोस मिळणार आहे. सध्या एकूण लाभार्थ्यांपैकी 85 टक्के जनतेला पहिला डोस मिळाला असून उरलेल्या 15 टक्के नागरिकांना डिसेंबरअखेर पहिला डोस
मिळणार आहे.
राज्यात 18 व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या 9 कोटी 14 लाख 35 हजार इतकी आहे. त्यापैकी 7 कोटी 65 लाख नागरिकांना पहिला डोस मिळाला असून अजून 1 कोटी 47 लाख लाभार्थ्यांना पहिला डोस मिळणे बाकी आहे. मात्र, राज्य शासनाने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. दररोज दहा लाख लाभार्थ्यांना लस देण्यात येत असून त्यापैकी 60 टक्के डोस हे पहिल्या नागरिकांना देण्यात येत आहेत. तर उरलेले 40 टक्के डोस हे दुस-या लसीकरणाचे आहेत, अशी माहिती राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली.
लसीकरणाचा वेग वाढवण्याचे कारण ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचे राज्यावर आलेले संकट हेदेखील आहे. ओमायक्रॉनचा प्रसाराचा वेग सध्याच्या डेल्टापेक्षा सात पटीने अधिक असून तज्ज्ञांनी जानेवारीत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामध्ये ज्यांनी लस घेतली आहे त्यांना बऱ्यापैकी या नव्या विषाणूपासून संरक्षण मिळणार असून, जरी त्यांना लागण झाली तरी फारशी गंभीर नसणार आहे. त्यामुळे, लसीकरणाचे कवच वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
राज्यात ठाणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये लसीकरण लाभार्थींची संख्या जास्त आहे. ठाण्यात 74 लाख, नाशिक 51 लाख, जळगाव 34 लाख, अहमदनगर 36 लाख, नांदेड 27 लाख आणि सोलापूर 34 लाख लाभार्थी आहेत. या सर्व ठिकाणी अनुक्रमे 15 लाख, 12 लाख, 9.63 लाख, 9.25 लाख, 9.22 लाख आणि 9.18 लाख लाभार्थ्यांना पहिला डोस मिळणे बाकी आहे. या सहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लाभार्थी असून इतर जिल्ह्यांमध्ये ब-यापैकी लसीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष देण्याच्या सूचना राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिल्या आहे.
राज्यातील 9 कोटी 14 लाख लाभार्थ्यांपैकी 4 कोटी 37 लाख जणांना दुसरा डोस मिळाला आहे. ही टक्केवारी सर्वसाधारणपणे 49 टक्के इतकी आहे. तर सध्या राज्यात आजच्या तारखेला 85 लाख लाभार्थी कोविशिल्डच्या दुस-या डोसच्या तर, 13 लाख लाभार्थी कोव्हॅक्सिनच्या दुस-या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्यात मुंबई आणि पुणे लसीकरणात आघाडीवर आहेत. मुंबईमध्ये तर 92 लाखांचे लक्ष्य पूर्ण होऊन त्यापेक्षा 3 लाख नागरिकांना डोस दिले आहेत. तर पुण्यात लाभार्थींची संख्या 83 लाख असून त्यापैकी 82 लाख 60 हजार जणांना पहिला डोस मिळाला आहे. आता उरलेल्या 82 हजार नागरिकांना डोस देण्यात येत आहे. हा देखील लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
''राज्यात डिसेंबरअखेर 100 टक्के लाभार्थींना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या राज्यात दररोज 10 लाख एकूण लाभार्थींचे लसीकरण करण्यात येत असून, त्यापैकी 60 टक्के पहिला तर उरलेल्या 40 टक्के लाभार्थींना दुसरा डोस देण्यात येत आहे. तसेच लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी 'हर घर दस्तक' मोहिमेला डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचा-यांकडून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येत आहे, तर दुसरा डोसच्या लाभार्थ्यांना फोन करून बोलावले जात आहे.''
– डॉ. सचिन देसाई, राज्य लसीकरण अधिकारी, आरोग्य विभाग.