सोलापूर; जगन्नाथ हुक्केरी : पूजा असो वा विधी अथवा मानवाची शेवटची यात्रा म्हणजेच अंत्यविधी या सगळ्या प्रसंगात हमखास आवश्यक असणारी बाब म्हणजे फुल. सध्या कोरोना महामारीमुळे देऊळबंद, सण, उत्सवांबरोबरच सभा, समारंभ आणि अंत्यविधीच्या गर्दीवरही नियंत्रण आल्याने फुलांना मागणीच कमी झाली. यामुळे फुल उत्पादकांबरोबरच फुल, हार विक्रेत्यांवर चक्क संक्रांत आली आहे.
सोलापूर जिल्हा हा धार्मिक पर्यटनासह उत्सवांमुळे संपूर्ण देशात परिचित आहे. सोलापूरसह अक्कलकोट येथील गणेशोत्सवाचे सार्या राज्याला आकर्षण आहे. गतवर्षापासून कोरोनाने घेराव घातल्याने सण, उत्सव बंदच आहेत. याशिवाय यात्रा, जत्रा, उरुसावरही बंदी घालत मंदिरांसह धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात आली. यामुळे फुले वाहून दर्शन घ्यायचे कुठे, हाही प्रश्न निर्माण झाला. याच अडचणीतून फुलांच्या मागणीत घट झाली आणि फुल विक्रेत्यांच्या नशिबी मात्र अडचणीचे ढगच दाटून आले.
लाखो रुपये खर्च करुन जोपासलेल्या विविध फुलांच्या बागांतून कवडीमोल उत्पन्न मिळत असल्याने शेतकर्यांनी त्यावर नांगर फिरवत फुलांची बाग उद्ध्वस्त केली. 'बिका तो फुल, नही तो धूल' असे म्हणत खर्च वाया गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सोलापुरातील शिवयोगी सिद्धरामेश्वर, आजोबा गणपती, पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, वडवळचे नागनाथ, मार्डीची यमाई, कासेगाव, काशीलिंग, जेऊर, हैद्रा, अकलूजची अकलाई देवी, बार्शीचे भगवंत यासह शहर व जिल्ह्यातील बहुतांश धार्मिक स्थळे बंदच आहेत. यामुळे दर्शनासाठी नागरिकांना जाता येत नाही. मंदिराच्या वाटेवरच निर्बंधाचे काटे पसरल्याने फुल विक्रीचेही वाटोळे झाले. यामुळे फुल विक्रेत्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
सोलापूर जिल्ह्यात 500 हेक्टरहून अधिक फुल शेतीचे क्षेत्र असून फुल उत्पादकांसह विक्रेते, असे 10 हजारजणांचे कुटुंब यावर अवलंबून आहे. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या निर्बंधाचा फटका बसत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करण्याकडे नागरिकांचा कल आहे. वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल कॉलेज परिसरात 24 लाख रुपये खर्च करुन जर्बेराची बाग फुलविण्यात आली. गतवर्षी कोरोनाचा दणका या बागेला बसला. वाहतूक बंद असल्याने व लॉकडाऊनमुळे फुलांची विक्रीच करता आली.
यामुळे ग्रीन हाऊससह एसी, औषधे याबरोबरच उत्पादन खर्चही निघाला नाही. यामुळे उत्पादकांनी नुकसानीवर आळा घालत या बागेवर नांगर फिरवून वांगीचे पीक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात फुल शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी नुकसानीचा विचार न करता नव्याचा ध्यास घेऊन पर्याय शोधावा. नाशवंत फुले टिकवून विक्री करण्याचे कौशल्य शोधावे.
– डॉ. सचिन फुगे
उपप्राचार्य, लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा