file photo 
सातारा

कराड : काँग्रेसला बहुमत मिळवण्याची संधी

सोनाली जाधव

कराड : पुढारी वृृत्तसेवा
मागील पंचायत समिती निवडणुकीत कराड तालुक्यात भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील कराड तालुका विकास आघाडी यांच्यात लढत झाली होती. आता उंडाळकर गट काँग्रेसमध्ये सक्रीय झाल्याने काँग्रेसला पंचायत समितीवर स्वबळावर सत्ता मिळवण्याची संधी चालून आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसपुढे सभापती पद कायम राखण्याचे आव्हान असणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर कराड दक्षिणेत भाजपा काँग्रेसला किती फटका देणार ? यावरही राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

2017 साली झालेल्या जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व उंडाळकर गटाने प्रत्येकी 7 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपाने 6 आणि काँग्रेसने 4 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर 2012 प्रमाणेच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सभापती पद आणि उंडाळकर गटाच्या कराड तालुका विकास आघाडीने उपसभापती पद घेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. पंचायत समितीत आजही हेच समीकरण कायम आहे. मात्र मागील पाच वर्षातील राजकीय परिस्थिती आणि सध्यस्थितीतील राजकीय परिस्थिती याच जमीनआस्मानचा फरक आहे. 2017 साली आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि उंडाळकर गट एकमेकांविरूद्ध लढले होते. या दोन्ही गटांना प्रत्येकी तीन अशा एकूण सहा जिल्हा परिषद जागा मिळाल्या होत्या. तर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन जिल्हा परिषद जागांवर विजय मिळाला होता.

काँग्रेसतंर्गत दोन्ही गट एकत्र आल्याने कराड दक्षिणमध्ये काँग्रेस अधिक मजबूत झाली आहे. त्याचवेळी 2010 सालच्या कृष्णा कारखाना निवडणुकीचा इतिहास पाहता प्रत्येक निवडणुकीत एक अधिक एक असे होऊ शकत नाही, तर कधी कधी याचा फटकाही सहन करावा लागतो हे दाखवून देणारा हा निकाल होता. त्यामुळेच दोन्ही काँग्रेसतंर्गत गटांना तळागाळातील कार्यकर्त्यांची एकसंघ मोट बांधत नाराजी टाळण्यात यश आल्यास कराड दक्षिणेत भाजपापुढे कडवे आव्हान उभे करण्यात काँग्रेस यशस्वी होणार अशीच चिन्हे आहेत.याशिवाय भाजपाला कोयना वसाहत, कालवडे यासारख्या गणातील मागील निवडणुकीत झालेले निसटते पराभव पुन्हा टाळण्यासाठी मोठी मोर्चे बांधणी करावी लागणार आहे. याशिवाय कृष्णाकाठी वर्चस्व कायम राखण्यासाठी काँग्रेसचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे. कोळे – विंग विभाग आणि उंडाळे विभाग काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तर मागील निवडणुकीत कालेतील भीमराव पाटील गट उंडाळकर गटासोबत होता. तर मागील वर्षी झालेल्या कृष्णा कारखाना निवडणुकीत हा गट डॉ. अतुल भोसले यांच्यासोबत होता. त्यामुळेच हा गट आता कोणती भूमिका घेणार ? यावरही काले जिल्हा परिषद गटातील समीकरणे अवलंबून असणार आहेत.

कराड दक्षिणेत ही परिस्थिती असतानाच कराड उत्तरेत मात्र राष्ट्रवादीला सर्व जागांवर विजय मिळवा लागणार आहे. असे झाले तरच पंचायत समितीवरील वर्चस्व राष्ट्रवादी काँगे्रसला अबाधित ठेवणे सुलभ होणार आहे. याशिवाय वारूंजी, टेंभू, कोरेगाव, सैदापूर या विभागात पालकमंत्री बाळासाहेब पाटील गटाची मोठी ताकद आहे. त्यामुळेच वारूंजीसह कार्वे गटातील एका पंचायत समिती गणासह सैदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढून विजयी झाल्यास सभापती पद राखण्यास राष्ट्रवादीला कोणाच्या मदतीची गरजच भासणार नाही. त्यामुळेच या निवडणुकीत नामदार बाळासाहेब पाटील गटाकडून सर्व प्रतिष्ठा पणाला लावली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचवेळी काँग्रेसला पंचायत समितीचे सभापती पद मिळवून गतवैभव प्राप्‍त करून घेण्याची संधी या निवडणुकीमुळे चालून आली आहे.एकूणच राज्यातील सर्वात मोठ्या पंचायत समितीमध्ये गणना होत असलेल्या कराड पंचायत समितीवरील वर्चस्वासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मोठी चुरस पहावयास मिळणार आहे. त्याचवेळी त्रिशंकू अवस्था झाल्यास भाजपाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

भाजपाच्या विजयावर राष्ट्रवादीची मदार ..

कराड दक्षिणेत भाजपा जितक्या जास्त जागा जिंकणार ? तितकाच जास्त पंचायत समितीवरील वर्चस्वासाठी राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. तर कराड उत्तरमध्ये विजयाची फारशी अपेक्षा नसलेल्या दक्षिणेतील काँग्रेस नेत्यांकडून दक्षिणमधील जास्तीत जास्त जागा जिंकत बहुमताची मॅजिक फिगर गाठण्यासाठी प्रयत्न होताना पहावयास मिळणार आहेत.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT