कोल्हापूर : गावागावांत रंगली गण, गटांच्या रचनेची चर्चा

कोल्हापूर : गावागावांत रंगली गण, गटांच्या रचनेची चर्चा
Published on
Updated on

कोल्हापूर ; विकास कांबळे : मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे आता संपूर्ण जिल्ह्यात चांगलेच वाहू लागले आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद मतदारसंघ (गट) आणि पंचायत समिती मतदारसंघांची (गण) नव्याने रचना करण्यात आल्यामुळे अनेक गटांच्या व गणांच्या रचनेत बदल झाला आहे. हा बदल कसा असेल? याविषयी गावागावांत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

कोरोना संसर्गामुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कोल्हापूर महापालिकेचाही समावेश आहे. महापालिकेबरोबरच राज्यातील मुदत संपणार्‍या जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही दोन-तीन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे. निवडणुका लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत असले, तरी प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मतदारसंघांची प्रारूप रचना तयार करण्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर रचनेचे काम सुरू करण्यात आले. लोकसंख्येच्या आधारे प्रभागांची रचना करण्यात येणार आहे. 1990 पासून गेल्या 30 वर्षांत लोकसंख्या आणि मतदानामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने आगामी निवडणुकांत राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढणार आहे. यात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे 9, तर पंचायत समित्यांचे 18 सदस्य वाढणार असल्याने जिल्हा परिषदेचे 76, तर पंचायत समित्यांचे 152 सदस्य असणार आहेत. यात आणखी एक-दोन गट वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील गटांच्या आणि गणांच्या प्रारूप रचनेमध्ये एक-दोन तालुक्यांत बदल होणार नाही. परंतु, गेल्या चार-पाच वर्षांत जिल्ह्यात नवीन पाच नगरपालिका, नगरपंचायती अस्तित्वात आल्यामुळे गटांच्या व गणांच्या रचनेत बदल होणार आहेत. हे प्रारूप जिल्हा निवडणूक शाखेने तयारही केले आहे.

ते राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे. याबाबत गोपनीयता बाळगण्यात येत आहे. त्यातूनही ग्रामीण भागामध्ये बदललेल्या गटांची व गणांची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरदेखील या गावांचा अमुक गटामध्ये समावेश, अमुक गटातील गावे दुसर्‍या गटात टाकण्यात आली, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. जिल्हा निवडणूक आयोगाने सादर केलेल्या गट व गणांची प्रारूप रचना दि. 11 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषद सध्याचे मतदारसंघ (गट) : 67

खुला प्रवर्ग : 19, सर्वसाधारण महिला : 20, अनुसूचित जाती, जमाती पुरुष : 4, महिला : 5, अनुसूचित जमाती : 1, ओबीसी पुरुष : 9, ओबीसी महिला : 9

पंचायत समिती सध्याचे मतदारसंघ (गण) : 133

खुला प्रवर्ग : 42, सर्वसाधारण महिला : 36, अनुसूचित जाती, जमाती पुरुष : 8, महिला : 10, ओबीसी पुरुष : 16, ओबीसी महिला : 21

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news