कोल्हापूर : जि.प.9, पं.स.18 नवे मतदारसंघ | पुढारी

कोल्हापूर : जि.प.9, पं.स.18 नवे मतदारसंघ

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आठ तालुक्यांत मतदारसंघांच्या संख्येत वाढ होणार आहे. जिल्हा परिषदेचे 9 गट, तर पंचायत समितीचे 18 गण वाढणार आहेत. चार तालुक्यांत मात्र मतदारसंघांची संख्या कायम राहणार आहे. जिल्हा प्रशासन या प्रारूप मतदारसंघाच्या कच्च्या आराखड्याचे शुक्रवारी (दि. 11) राज्य निवडणूक आयोगासमोर सादरीकरण करणार आहे.

राज्यातील 25 जिल्हा परिषदांची मुदत मार्च 2022 मध्ये संपत आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषद मतदारसंघांच्या सूत्रात बदल केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 9, तर पंचायत समित्यांचे 18 नवे मतदारसंघ तयार होणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे एकूण 67 गट (मतदारसंघ) होते. आता लोकसंख्यानिहाय मतदारसंघाची संख्या निश्‍चित केली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी 76 मतदारसंघ निश्‍चित करण्यात आले आहेत.

करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन तर पंचायत समितीच्या चार नव्या मतदारसंघाची भर पडली आहे. शाहूवाडी, पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले, राधानगरी, कागल आणि चंदगड या तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एक तर पंचायत समितीचे प्रत्येकी दोन मतदारसंघ वाढणार आहेत. गगनबावडा, भुदरगड, आजरा आणि चंदगड या चार तालुक्यांत पूर्वीप्रमाणेच मतदारसंघाची संख्या कायम राहणार आहे.

वाढीव मतदारसंघामुळे करवीरसह पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले, राधानगरी, कागल आणि चंदगड तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे.

Back to top button