सातारा; पुढारी वृत्तसेवा : साताऱ्यातील सदाशिव पेठ येथील श्री दत्त पूजा भांडारवर वन विभागाने धाड टाकली. वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून ही कारवाई केली. यावेळी इंद्रजाल अर्थात 'काळे कोरल' ह्या सुमुद्री प्राण्याचे अवशेष मिळून आले. त्याची संख्या ५९ इतकी आहे. वन विभागाची धाड पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दत्त पूजा भांडारचे मालक संतोष लक्ष्मण घोणे यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक झाली आहे.
जप्त 'इंद्राजाल' मालाची किंमत सुमारे चार लाख रुपये इतकी आहे, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. वनाधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या झडतीमध्ये श्री दत्त भांडार या दुकानातून चंदनाचे ८० किलो तुकडे व ६०० मोरपिसे जप्त केली आहेत. ह्या वस्तू बाळगणे व विकणे वन कायद्यानुसार गुन्हा आहे. संबंधित प्रकारचा मुद्देमाल कोणी बाळगत असेल अथवा विक्री करत असेल तर त्याची खबर वनविभागास द्यावी, असे अवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे.
ही कारवाई महादेव मोहिते उपवनसंरक्षक (प्रा.) सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सुधीर सोनवले सहा. वन संरक्षक सातारा निवृत्ती चव्हाण वनक्षेत्रपाल (प्रा.) सातारा, वनपाल कुशल पावरा, प्रशांत पडवळ, वनरक्षक सुहास भोसले, साधना राठोड, राज मोसलगी, अशोक मलप, सूर्याजी ठोंबरे वाहन चालक सुरेश गभाले, संतोष दळवी यांनी केली.