मुंबई : इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबाने केला पाकच्या मदतीने साम्राज्यविस्तार

मुंबई : इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबाने केला पाकच्या मदतीने साम्राज्यविस्तार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय पातळीवरील बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशांचा पर्दाफाश करणार्‍या पँडोरा पेपर्समध्ये अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. यात मुंबई बाँम्बस्फोट प्रकरणातील मुख्य फरार आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबियांनी पाकच्या मदतीने वैश्‍विक साम्राज्याचा विस्तार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पनामातील लॉ फर्म एककोगलच्या अहवालातून ही माहिती समोर येत आहे. एलकोगल हा पँडोरा पेपर्सचा भाग आहे. इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी बेकायदेशीररित्या मुंबई सह दुबईतील शेकडो कोटी रुपयांच्या मालमत्ता आणि परदेशातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली.

मिर्चीच्या कुटुंबातील इतर सदस्य इक्बालपेक्षा एक पाऊल पुढे असून त्यांचे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाशीही संबंध असल्याचा खुलासा या पेपर्समधून करण्यात आला आहे.

इक्बाल मिर्ची च्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई आणि दुबईतील परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करीत साम्राज्याचा विस्तार केला. पाच वर्षांनंतर इक्बाल मिर्चीची पहिली पत्नी हाजरा इक्बाल मेमन हिने ही सगळी मालमत्ता दोन मुले जुनैद मेमन आणि आसिफ इक्बाल यांच्या नावे हस्तांतरीत केली, असाही दावा यातून करण्यात आला आहे.

पनामा पेपर्स उघडकीस आल्यानंतर मिर्ची कुटुंबाने या परदेशातील कंपन्या मोसॅक फोन्सेका मधून ब्रिटनमधील ट्रायडन्ट ट्रस्टला हस्तांतरीत केल्या. पनामातील लॉ फर्मला 2018मध्ये टाळे लागण्यापूर्वीच हा व्यवहार करण्यात आला. ट्रायडन्टच्या इ मेलमध्येही या मोसफॉन प्रकल्पाचा उल्लेख आढळला आहे.

इक्बाल मिर्चीची दुसरी पत्नी हिना कौसरचा भाऊ अकबर आसिफचेही उल्लेख पँडोरा पेपर्समध्ये करण्यात आले आहेत. अकबर आसिम हा मुघल ए आझम चित्रपटाचे दिग्दर्शक के आसिफ यांचा मुलगा आहे. 2004मध्ये त्याने भारतीय चित्रपटांवरील बंदी उठविण्याची मागणी करण्यासाठी पाकिस्तानचे तत्कालिन लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांची भेट घेतली होती. दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्चीला स्कॉटलँड पोलिसांनी1994मध्ये अटक केली होती. त्यानंतर 2013मध्ये इक्बालचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news