सातारा

Covid-19 Satara : जिल्ह्यातील 503 बाळांनी कोरोनाला नमवले

मोनिका क्षीरसागर

सातारा : विशाल गुजर
कोरोनाविरोधात सगळे जग लढत होते त्यावेळच्या युद्धजन्य काळातच जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन वर्षांत 503 पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती होवून त्या बालकांनी या जगात प्रवेश केला. विशेष म्हणजे यातील 4 अर्भके जन्मत:च कोरोनाबाधित होती तर 387 अर्भकांमध्ये कोरोनाची अतिसौम्य लक्षणे दिसून आली. या बाळांना कोरोनाचा जास्त संसर्ग नसल्याने योग्य वैद्यकीय उपचार आणि जन्मजात प्रतिकारशक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना व लॉकडाऊन काळात अनेक महिलांचा कल गर्भधारणा टाळण्याकडे होता. त्यातूनही गर्भवती राहिलेल्या महिलांची खासगी रुग्णालयात सोय झाली. कोरोनाबाधित गर्भवतींसाठी मात्र, फक्‍त जिल्हा रुग्णालयातच व्यवस्था होती. कोरोना संसर्गापासून स्वत:ला सुरक्षित ठेवत डॉक्टरांनी प्रसुती यशस्वी केल्या आहेत. एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2022 या कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 503 कोरोना बाधित महिलांची प्रसुती झाली. या महिलांवर कोरोनाचे उपचारही सुरु होते. त्यामुळे प्रसुती अधिक आव्हानात्मक होती.

प्रसुतीकाळात रक्‍तदाब, मधुमेह, काविळ आदी विकार ऐनवेळी उदभवत असल्याने कोरोनाच्या दृष्टीने धोक्याची स्थिती होती. नवजात अपत्यांना जन्मत:च कोरोना संसर्ग होत असल्यानेही डॉक्टरांच्या चिंतेत भर पडली होती. 503 पैकी 4 अर्भके बाधित आढळली होती. मात्र, 387 अर्भकांमध्ये कोरोनाची अतिसौम्य लक्षणे दिसून आली. पण मातेसोबतच त्यांच्या शरिरातही कोरोनाची प्रतिजैवके तयार राहिली. त्यामुळे ही अर्भके कोरोनातून सहिसलामत बाहेर पडली. जन्मल्यावर पहिल्या काही दिवसांतच कोरोनाची लक्षणे नाहीशी होवून अर्भके ठणठणीत बरी झाली. त्यांच्यावर कोरोनाचे विशेष उपचार करावे लागले नाहीत.

दरम्यान, कोरोनाबाधित एका गर्भवतीच्या अर्भकाचा गर्भातच मृत्यू झाला आहे. महिलेमध्ये अन्य गुंतागुंत निर्माण झाल्याने हे अर्भक जगात प्रवेश करु शकले नाही. 4 अर्भके मातेबरोबरच बाधित आढळली होती. तर दोन मातांचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याच्या घटना कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात जिल्हा रुग्णालयात घडल्या आहेत. मात्र, त्यांची बालके सुखरुप राहिली आहेत.

प्रसुती विभाग कौतुकास पात्र…

कोरोना झाल्यावर साधारणत: ऑक्सिजन पातळी 80 च्या खाली आल्यानंतर संबंधित रूग्णांवर काळजीपूर्वक उपचार करावे लागतात. त्यामध्ये अनेक जण उपचाराला प्रतिसाद देतात तर काही जण देत नाहीत. अशावेळी डॉक्टर व नर्स यांची भूमिका मोलाची असते. अशा परिस्थितीत ऑक्सिजन पातळी 40 ते 50 पर्यंत असलेल्या महिलांना अतिदक्षता विभागात चांगले उपचार करण्यात आल्याने त्या ठणठणीत झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा रूग्णालयातील प्रसुती विभाग कौतुकास पात्र आहे.

नवजात अर्भकांमध्ये कोरोना विरोधातील प्रतिजैविके निसर्गत:च तयार झाली होती. त्यामुळे त्यांनी कोरोनावर सहज मात केली. बालकांना कोरोनाचे वेगळे उपचार द्यावे लागले नाहीत. कोरोनामुळे त्यांच्या जीवाला धोकाही नव्हता. माता व बालकांना सुखरूप ठेवण्यात आमच्या टीमचा मोलाचा वाटा आहे.
– डॉ. सुहास कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT