मिरज : रेल्वे हद्दीत अतिक्रमणे | पुढारी

मिरज : रेल्वे हद्दीत अतिक्रमणे

मिरज पुढारी वृत्तसेवा : पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचे काम करण्यात येत आहे. येत्या महिनाभरात पुणे-कोल्हापूर विद्युत रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे हद्दीतील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. परंतु अद्याप काही ठिकाणी अतिक्रमणे ‘जैसे थे’ आहेत.

रेल्वेने आतापर्यंत हैदरखान विहिरीजवळील सुमारे 65 पक्क्या घरांची अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. त्यानंतर भगतसिंगनगर येथील झोपडपट्टी धारकांना नोटीस बजाविण्यात आली होती. परंतु येथील रहिवाशांनी अतिक्रमणे काढण्यापूर्वी घरे रिकामी करण्याची परवागी रेल्वेकडे मागितली होती. त्यामुळे त्यांना ती देण्यात आली होती. त्यानुसार काही झोपडपट्टीधारकांनी घरे रिकामी केली आहेत. परंतु या ठिकाणी काही जणांनी पक्की घरे बांधल्याचे दिसून येते.

मिरज-सांगली रस्त्यावरील रेल्वे हद्दतील 35 झोपडपट्टीधारकांची अतिक्रमणे रेल्वेने हटविली आहेत. तर 10 ते 15 झोपड्यांची अतिक्रमणे काढण्याबाबत फेब्रुवारी महिन्यात नोटीस बजाविण्यात आली होती. परंतु ती अद्याप काढण्यात आलेले नाहीत.

मिरज-कृृष्णाघाट रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यासाठी रेल्वेने शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच या कामाची देखील सुरुवात होणार आहे. या पुलाची उभारणी करताना मिरज-बेळगाव रेल्वेमार्गा लगत असलेली झोपडपट्टी हटविणे आवश्यक आहे. परंतु रेल्वेकडून अद्याप याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

माधवनगर येथे जुन्या रेल्वे स्थानकासमोर माधवनगर ग्रामपंचायतीने कचरा डेपो केला आहे. नॅरोगेज रेल्वेलाईन बंद झाल्यानंतर या स्थानकाकडे रेल्वेचे दुर्लक्ष झाले आहे. जागा रेल्वेची असली तरी सध्या या ठिकाणी माधवनगर ग्रामपंचायतीचा कचरा डेपो आहे.

Back to top button