सांगली; पुढारी वृत्तसेवा : गणपती विसर्जन करण्यासाठी सरकारी घाट येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. नदीपात्रात मूर्ती विसर्जन करताना नावेत होणारी गर्दी दुर्घटनेस निमंत्रण ठरू शकते. म्हणून याला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. नाहीतर दुर्घटनेचा धोका होऊ शकतो.
पाचव्या दिवशी संस्थान गणपती विसर्जन वेळी नदीपात्रात 12 होड्या नदी पत्रात होत्या. यात काही यांत्रिक बोटी आणि नावाही होत्या. धरणातून सोडलेल्या पाण्याला प्रचंड वेग असल्याने विसर्जनाच्या वेळी तीन वेळा यांत्रिक बोटी एकमेकांना धडकल्या. तर क्षमतेपेक्षा अधिक लोक नावेत बसल्याचेही दिसत होते.
अप्रशिक्षित आणि नवखे चालक असल्याने पाण्याच्या वेगाचा अंदाज येत नव्हता. केवळ दैव बलवत्तर म्हणून दुर्घटना टळली. असा धोका टाळण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.
महापुराच्या काळात अनेक नवीन यांत्रिक बोटी घेण्यात आल्या आहेत त्यातून काही अतिउत्साही तरुण स्टंटबाजी करत सेल्फी घेण्यासाठी नावेतून फेरफटका मारतात यावरही निर्बंध घालणे गरजेचे आहे.