Sonu Sood : अभिनेता सोनू सूद याच्‍या कार्यालयाची आयकर विभागाकडून पाहणी | पुढारी

Sonu Sood : अभिनेता सोनू सूद याच्‍या कार्यालयाची आयकर विभागाकडून पाहणी

मुंबई : पुढारी ऑनलाईन : अभिनेता सोनू सदू (Sonu Sood ) याच्‍या कार्यालयाची आज आयकर विभागाचे अधिकारी पाहणी करत आहेत, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.  सोनू सूद (Sonu Sood ) याच्‍या संबंधित सहा ठिकाणी ही पाहणी सुरु आहे.

सोनू सूदची नुकतीच दिल्‍ली शालेय शिक्षणासाठी ब्रँड ॲम्‍बेसिडर म्‍हणून निवड झाली आहे. यानंतर तो आम आदमी पार्टीमध्‍ये सहभागी होणार अशी चर्चा होती. यानंतर आयकर विभागाने त्‍याच्‍या कार्यालयामधील आर्थिक व्‍यवहारांची पाहणी करत असल्‍याने अनेकांच्‍या भूवया उंचावल्‍या आहेत.

दिल्‍लीतील एका कार्यक्रमात सोनू सूदने आम आदमी पार्टी सरकारच्‍या कार्याचे कौतूक केले होते. तसेच आम आदमी पार्टीत सहभागी होणार नसल्‍याचे त्‍याने स्‍पष्‍ट केले होते.

कोरोना काळात हजारो नागरिकांना दिला मदतीचा हात

अभिनेता सोनू सूदने मागील वर्षापासून कोरोना काळात हजाराे नागरिकांना मदतीचा हात दिला होता.

तो फोन आणि सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून कोरोनाग्रस्‍तांची मदत करत होता.

या काळात त्‍याने स्‍थलांतरीत मजुरांना केलेली मदत हा चर्चेचा विषय ठरला.

आपल्‍या कुटुंबासह पायी घरी जाणार्‍या स्‍थलांतरीत मजुरांसाठी सोनू सदुने वाहनांची व्‍यवस्‍था केली.

तसेच त्‍याने कोरोनाग्रस्‍तांना  आर्थिक आणि वैद्‍यकीय मदत मोठ्या प्रमाणावर केली.

सध्‍याही त्‍याला नागरिक सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून मदत मागतात. त्‍आजही सोनू सूद त्‍यांना मदत पोहचवतो.

कोरोनाबरोबर नागरिकांच्‍या अन्‍य समस्‍या सोडविण्‍यातही तो आघाडीवर आहे. या कार्याबद्‍दल त्‍याच्‍यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मागील काही दिवसांपासून सोनू सूद हा राजकारणात सक्रीय होईल, अशी चर्चा रंगली होती.

आम आदमी पार्टीने दिल्‍ली शालेय शिक्षणासाठी ब्रँड ॲम्‍बेसिडर म्‍हणून त्‍याची निवड केली हाेती. यानंतर या चर्चेला आणखी वेग आला. मात्र त्‍याने आपण राजकारणात सक्रीय होणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट करत या चर्चेवर पडदा टाकला होता.

आता आयकर विभागाने केलेली कारवाईचा तपशील अद्‍याप स्‍पष्‍ट झाला नसला तरी सोनू सूद याच्‍या आर्थिक व्‍यवहारांची पाहणी कोणत्‍या कारणांसाठी होत आहे, याची चर्चा बॉलीवूडसह सर्वसामान्‍य नागरिकांमध्‍ये सुरु झाली आहे.

हेही वाचलं का?

व्‍हिडिओ

 

 

Back to top button