सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर | पुढारी

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहूल पवार हे स्वत:ला स्वयंघोषित नेता समजत आहे, अशी टिका माजी पदाधिकारी जमीर रंगरेज यांनी केली. रंगरेज यांची लायक काय? असे प्रत्युत्तर युवक पदाधिकार्‍यांनी आज पत्रकार परिषेद घेऊन दिले.

रंगरेज म्हणाले की, गेल्या वीस वर्षापासून मी पक्षात निष्ठावान म्हणून काम करीत आहे. आता पक्षात आलेल्या राहुल पवार यांची मनमानी सुरु आहे. प्रभागात बुथ कमेटी नेमताना नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. ज्यांचे काही काम नाही, त्यांना कमेटीवर घेतले जात आहे. प्रभागातील कामात हस्तक्षेप केला जातो. पक्षाच्या बैठकांना निमंत्रित केले जात नाही. याबाबत आमचे नेते पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. बैठक घेऊन एकत्रित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

दरम्यान रंगरेज यांच्या टिकेनंतर युवक पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन टिका केली. रंगरेज यांनी स्वतःची पात्रता ओळखून बोलावे. केवळ पोष्टरबाजी करून मोठे होत नाही. गोरगरीबांच्यासाठी त्यांनी काय केले आहे. पावसाळ्यातील बेडका प्रमाणे ते केवळ निवडणुकीच्या काळात बाहेर पडतात. त्यांच्याबाबत आम्ही पालकमंत्री पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहे. याउलट राहुल पवार यांनी महापालिका क्षेत्रात बुथ बांधणी जोरदारपणे करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे युवकांचा ओढा वाढत आहे.

डोळ्यांचे ऑपरेशन, निराधार पेन्शन योजना, बांधकाम कामगार नोंदणी आदी कामे ते करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल ना. जयंत पाटील, हसन मुश्रीफ यांनी घेतल्याने रंगरेज यांच्या पोटात दुखत आहे. यापुढे चुकीचे वक्तव्य केल्यास त्यांची लायकी दाखवून देऊ.

यावेळी गॅबियल तिवडे, अजिंक्य पाटील, संदीप व्हनमाने आदि उपस्थित होते.

Back to top button