इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा : इस्लामपूर नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमधील (NCP corporator) अंतर्गत वाद आज (बुधवार) पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे व माजी नगरसेवक पिरअली पुणेकर यांच्यात जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली. शिव्यांची लाखोली वाहत दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. राष्ट्रवादीच्या अन्य नगरसेवकांसमोर हा प्रकार घडला. या प्रकारामुळे पालिका आवारात एकच खळबळ माजली. निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीअंतर्गत वाद उफाळून आल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार आहे.
बुधवारी राष्ट्रवादीचे काही नगरसेवक (NCP corporator) आपापल्या कामानिमित्त मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गेले होते. यावेळी ईदगाहसाठी मंजूर झालेल्या निधीतून करावयाच्या कामांच्या भूमिपूजनाचा विषय निघाला. यावेळी माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर व राष्ट्रवादीचे माजी गटनेते संजय कोरे यांच्यात शाब्दीक खडाजंगी झाली. त्यानंतर माजी नगरसेवक पिरअली पुणेकर व कोरे यांच्यातही जोरात वादावादी होवून ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांना मोठमोठ्याने शिव्यांची लाखोली वाहू लागले. त्यामुळे पालिका आवारात एकच खळबळ माजली.
हा आवाज ऐकून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मुख्याधिकारी साबळे यांच्यासह तेथे उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे यांनी दोघांना शांत करत हा वाद मिटविला. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये पार्टी मिटींग व पालिका सभागृहातील अंतर्गत वाद वेळोवेळी चव्हाट्यावर आला आहे. आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा ही गटबाजी उफाळून आली आहे.
पक्षांतर्गत असणाऱ्या गटबाजीचा फटका गत निवडणुकीत राष्ट्रवादीला बसला होता. त्यामुळे ५ वर्षे राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले होते. या ५ वर्षात ही गटबाजी थोपविण्यात पक्षश्रेष्ठींना अद्याप यश आलेले नाही हेच बुधवारच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
बुधवारी राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आपल्या कामानिमित्त मला भेटायला आले होते. ते नगरसेवक बाहेर पडताना माझ्या दालनाबाहेर त्यांच्यात काहीतरी शाब्दीक वादावादी झाली. नेमका हा वाद कशावरून झाला, याची मला माहिती नाही, असे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : "एक दिवस नको ३६५ दिवस महिलांचा सन्मान करा" – रूपाली चाकणकर | International Women's Day 2022