UP Election Result : योगी की अखिलेश ? दोन शेतकऱ्यांनी १० एकर जमीन लावली पणाला ! पैज जिंकल्यास... | पुढारी

UP Election Result : योगी की अखिलेश ? दोन शेतकऱ्यांनी १० एकर जमीन लावली पणाला ! पैज जिंकल्यास...

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) की, समाजवादी पार्टीचे सरकार स्थापन होणार? या प्रश्नाचे उत्तर उद्या (दि. १०) समोर येणार आहे (UP Election Result). उद्या निकालाचा अर्थातच मतमोजणीचा दिवस आहे. युपीमध्ये सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी प्रसिद्ध झाली. त्यानंतर पुन्हा राजकीय वातावरण तापले. एक्झिट पोलच्या आकड्यांवरून गदारोळ माजला. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजप सत्तेत विराजमान होईल अशी एक्झिट पोलची आकडेवारी सांगते. पण सपाचे नेते अखिलेश यादव यांना हे एक्झिट पोल मान्य नाहीत. भाजपचा पराभव करत आम्हीच सत्तेत येऊ असे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, हे सत्तेचे गणित सुटण्यापूर्वी यूपीच्या बदायूं जिल्ह्यामधून एक रंजक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये दोन शेतक-यांनी आपापल्या १० एकर जमीनीला डावावर लावले आहे. या जमीनीच्या पैजेची गोष्ट सा-यांच्या चर्चेचा विषय बनले आहे. संपूर्ण गाव भाजप समर्थक विजय सिंह आणि सपा समर्थक शेर अली या दोन शेतक-यांतील पैजेचे साक्षीदार बनले आहेत. दोघांच्या अंगठ्यांच्या ठशाचे करारपत्र तयार करण्यात आले आहे, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (UP Election Result)

हे प्रकरण आहे बदायूंच्या शेखूपूर विधानसभा मतदारसंघातील. येथील काकराळा नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या बिरियादांडी गावात राजकीय अंदाजावरून दोन शेतकऱ्यांमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे. (UP Election Result)

कोणत्याही चौकाचौकात किंवा चहाच्या टपरीवर कोणता पक्ष विजय मिळवेल आणि कोण पराभूत होईल अशी चर्चा रंगते, त्याचप्रमाणे विजय सिंह आणि शेर अली यांच्यात भाजप-सपा यांच्यातील राजकारणाच्या भविष्यवाणीवरून वाद निर्माण झाला. दोघांमधील वाद इतका वाढला की प्रकरण ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचले. विजय सिंहच्या मते भाजप पुन्हा सत्तेत येईल आणि योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होतील. पण शेर अलीला हा दावा मान्य नसून तो म्हणतो की, सपा उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करून त्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव होतील.

यानंतर गावातील प्रतिष्ठित लोकांना बोलावून पंचायत भरवण्यात आली. यावेळी दोघांनी जाहीर पैज लावली. याचे साक्षीदार पंच आहेत. या पैजेनुसार जर युपीमध्ये भाजपचे सरकार आले तर शेर अली शाह आपली १० एकर शेतजमीन विजय सिंह यांना एक वर्षासाठी शेतीसाठी देईल. पण जर सपाचे सरकार स्थापन झाले तर विजय सिंह यांना १० एकर शेतजमीन शेर अलीला एका वर्षासाठी द्यावी लागेल.

किशनपाल सेंगर, जयसिंह शाक्य, कान्हीलाल, राजाराम, उमेश, राजीव कुमार, सतीश कुमार यांच्यासह गावातील १२ प्रतिष्ठित लोक या पैजेचे साक्षीदार झाले आहेत, जेणेकरून दोन्ही बाजूंपैकी कोणीही मागे हटणार नाही. पंचायतीमध्ये एक करार करून त्यावर दोघांच्या आंगठ्यांचे ठसे घेण्यात आले आहेत. हे करारपत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकंदरीत १० मार्चच्या निकालाने यूपीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, कोणाचे सरकार येणार हे तर ठरेलच, पण बदायूंच्या बिरियादांडी गावात वर्षभरासाठी कुणाची १० एकर जमीन कुणाच्या हातात जाईल हेही स्पष्ट होईल.

आणखी वाचा..

Back to top button