महाड : स्फोटाच्या तपासकामी विशेष समितीची स्थापना | पुढारी

महाड : स्फोटाच्या तपासकामी विशेष समितीची स्थापना

महाड, पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील कांबळे तर्फे महाड या गावाच्या हद्दीतील खाणीमध्ये पोलिसांकडून झालेल्या स्फोटकांच्या स्फोट प्रकरणाची  (Explosion)  चौकशी करण्यासाठी तातडीने एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी  दिली. ते माध्यमांशी बोलत होते.

अशोक दुधे यांनी सांगितले की , मंगळवारी (दि.८) सायंकाळी साडेसात वाजता झालेल्या या भीषण स्फोटांचे परिणाम परिसरातील पाच किलोमीटरपेक्षा जास्त लांबी वरील घरांपर्यंत झाल्याचे वृत्त विविध ठिकाणी केलेल्या भेटीदरम्यान प्राप्त झाले आहेत. यामध्ये राजेवाडी, महाड शहराचा शेडाव परिसर ,नागलवाडी ,कांबळे तर्फे महाड, शिंदे कोंड, बिरवाडी, खरवली, आसनपोई, ढालकाठी या परिसरामधील नागरिकांना स्फोटाची तीव्रता जाणवल्याचेही विविध ठिकाणच्या नागरिकांनी सांगितले आहे

नवी मुंबई येथील तज्ज्ञ, पोलिसांच्या श्वान पथकाने स्फोट (Explosion) झालेल्या ठिकाणापासून एक किलोमीटरचा परिसर शास्त्रीय पध्दतीने तपासून तो स्वच्छ केला आहे. याप्रकरणी विशेष समितीमार्फत विहित मुदतीमध्ये प्रत्यक्षात काय घटना घडल्या याची माहिती घेऊन पुढील काळात अशी कामे करताना अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे दुधे यांनी सांगितले. तसेच या स्फोटांमधील जखमी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, माणगाव येथील २०१३ च्या एका गुन्ह्यामध्ये सदरचे जिलेटिन व डेटोनेटर पकडण्यात आले होते. ते पोलादपूर परिसरात सुरक्षित मॅगझिनमध्ये ठेवण्यात आले होते. पोलीस यंत्रणेने दिलेल्या आदेशानुसार पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या स्फोटकांना नष्ट करण्याचे काम मंगळवारी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. यावेळी झालेल्या स्फोटामुळे कांबळे तर्फे महाड ग्रामपंचायत हद्दीतील २५ पेक्षा अधिक घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडे नुकसानभरपाई देण्याबाबत मागणी करणार असल्याचे सरपंच राघोबा महाडिक यांनी सांगितले. शासनाने यापुढे राष्ट्रीय महामार्गालगत अशा पध्दतीचे स्फोट करू नयेत. अथवा त्यापूर्वी स्थानिक प्रशासनाला व नागरिकांना विश्वासात घ्यावे, असेही महाडिक यांनी म्हटले आहे.

भविष्यात पोलीस यंत्रणेकडून अशा पध्दतीची स्फोटके नष्ट करताना ती नागरी वस्ती लगत न करता जंगल भागामध्ये करावी. त्यासाठी आपण उच्च अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांना सूचना करू. परिसरातील नागरिकांच्या घरांच्या झालेल्या नुकसानीबाबत आपण शासकीय स्तरावर याबाबत येत्या ४ दिवसांत निर्णय घेऊन मार्ग काढू, असे आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : “महिलांनी राजकारणात आलं पाहिजे” – खा. प्रियांका चतुर्वेदी | International Women’s Day 2022

Back to top button