Imran Khan : पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारची भरली घटका; सत्ता वाचविण्यासाठी धडपड

इम्रान खान (संग्रहित छायाचित्र )
इम्रान खान (संग्रहित छायाचित्र )

इस्‍लामाबाद; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानातील इम्रान खान नियाझी सरकारचे अस्तित्व गंभीर संकटात सापडले आहे. पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. आता इम्रान खान यांच्याकडे सरकार वाचवण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. विरोधकांच्या घेरावामुळे घाबरलेले इम्रान खान आता एकीकडे आपल्या मित्रपक्षांचे मन वळवायला सरसावत आहेत आणि परकीय शक्तींना आपले सरकार पाडायचे आहे, असा दावा केला आहे. 'जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत असे होणार नाही', असे ते म्हणाले आहेत.

विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावानंतर इम्रान खान सातत्याने आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या मते, इम्रान खान ( Imran Khan ) यांचा पीटीआय पक्ष अविश्वास प्रस्तावामुळे कमालीचा घाबरला आहे. त्यामुळेच इम्रान खान आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. इम्रान खान यांनी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांची भेट घेतली, ज्यांना पदावरून हटवण्याची मागणी पाकिस्तानी पंतप्रधानांचे निकटवर्तीय करत आहेत. एवढेच नाही तर इम्रान खान यांनी अॅटर्नी जनरल यांची भेट घेऊन अविश्वास प्रस्तावावर त्यांचे मत जाणून घेतले आहे.

'विरोधकांच्या हालचालींमागे परकीय शक्तींचा हात' ( Imran Khan )

इम्रान खान आता कराचीच्या दौऱ्यावर जात आहेत, जेथे ते सिंधमधील त्यांचा पीटीआय पक्षाचा मित्रपक्ष एमक्यूएमपीच्या नेत्यांना भेटणार आहेत. इम्रान खान यांनी पीएम हाऊसमध्ये अनेक खासदारांची खासगी भेट घेतली आहे. इम्रान खान यांनी अनेक पत्रकारांना भेटून आपले सरकार पडणार नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांच्या या हालचालीमागे विदेशी शक्तींचा हात असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे. या राजकीय परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांचा पक्ष पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षांनी खासदारांना 18 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला आहे. इम्रान खान म्हणाले की, ज्यांना स्वतंत्र परराष्ट्र धोरण नको आहे, ते विरोधी पक्षांना पाठिंबा देत आहेत. ते म्हणाले की, पाकिस्तानी लष्कर 'या चोरांना' कधीही साथ देणार नाही. विरोधकांना जनतेचा पाठिंबा नाही, त्यामुळे त्यांना लष्कराचा पाठिंबा असल्याचा दावा ते करत आहेत.

'अमेरिका आणि मित्र देशांना इम्रान खानला हटवायचे आहे' ( Imran Khan )

इम्रानचे राजकीय घडामोडींचे विशेष सल्लागार शाहबाज गिल यांचे मते, अमेरिका आणि त्यांचे मित्र देश इम्रान खान यांना हटवू इच्छित आहेत. इम्रान खान यांची धोरणे त्यांच्या प्रादेशिक आणि जागतिक हिताच्या विरोधात आहेत, असे अमेरिकेला वाटते. त्यांचा इशारा चीनच्या सीपीईसी आणि रशियाच्या समर्थनाकडे होता. इम्रान खानचा हा खोटा असल्याचं पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news