Corbevax : लहान मुलांसाठी ‘कॉर्बेव्हॅक्स’ लस वापरास परवानगी द्या; बायोलॉजिकल-ई कंपनीचा अर्ज | पुढारी

Corbevax : लहान मुलांसाठी 'कॉर्बेव्हॅक्स' लस वापरास परवानगी द्या; बायोलॉजिकल-ई कंपनीचा अर्ज

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जागतिक कोरोना महारोगराई विरोधात लसीकरण एक प्रभावी हत्यार म्हणून वापरले जात आहे. अशात देशांतर्गत सुरू असलेल्या लसीकरण अभियानातून १७९ कोटींहून अधिक डोस टोचण्यात आले आहेत. दरम्यान देशातील कोरोना विरोधी तिसरी स्वदेशी ‘कॉर्बेव्हॅक्स’ (Corbevax) या प्रोटीन आधारीत लसीचा ५ ते १२ वयोगटातील मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपत्कालीन वापराची परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज बायोलॉजिकल-ई कंपनीने सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार कंपनीने ५ ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी विषय विशेष तज्ज्ञ समितीकडे अहवाल सादर केला आहे. समितीकडून अहवालाची चाचपणी केल्यानंतर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नुकतीच विषय तज्ज्ञ समितीने काही अटी घालत १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कॉर्बेव्हॅक्सचा आपत्कालीन वापराची शिफारस केली आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया (डीसीजीआय) लवकरच यासंबंधी परवानगी देण्याची शक्यता आहे.

संभावित कर वगळता कॉर्बेव्हॅक्स (Corbevax) लसीची किंमत १४५ रूपये आहे. या लसीचे ठराविक अंतरानंतर पहिला आणि दुसरा असे दोन डोस दिले जातील. केंद्राकडून अगोदरच जवळपास ५ कोटी कॉर्बेव्हॅक्सची खरेदी करण्यात आली असून या लशी काही राज्यात पोहचवण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लस बनवणाऱ्या कंपनीने सप्टेंबर २०२१ मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी अर्ज सादर केला होता, हे विशेष.आता कंपनीकडून अर्ज सादर करण्यात आल्याने लहान मुलांचे लसीकरण लवकरच सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचलंत का?

Back to top button