Government Hostel problem Pudhari
पुणे

Government Hostel: येरवडा शासकीय वसतिगृहात अराजक! तळीरामांचा अड्डा, घाणीने विद्यार्थ्यांचे जगणे बेचैन

सुरक्षेचा अभाव, ड्रेनेज तुंबले, कुत्र्यांचा त्रास — विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण दोन्ही धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: येरवडा येथे असलेल्या मुलांचे शासकीय वसतिगृह समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. हे वसतिगृह तळीरामाचा अड्डा बनले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, तसेच घाणीच्या साम्राज्याने विद्याथ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (Latest Pune News)

विद्येचे माहेरघर म्हणून शहराची देशाच्या कानाकोपऱ्यात ओळख आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने समाजकल्याण विभागामार्फत येरवडा येथे शासकीय मुलांचे वसतिगृह उभारण्यात आले आहे.

दोन ठिकाणी पाच मजली इमारत उभारून दोन्ही इमारती मिळून सुमारे चारशे ते पाचशे खोल्या बांधण्यात येऊन त्यांना विविध क्रमांक देऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, येथे असलेल्या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जवळपास अंदाजे आठ ते नऊ एकरमध्ये वसलेल्या या बसतिगृहात आणि कार्यालय आवारात मोकाट कुत्र्यांच्या वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

चेंबरची झाकणे गायब

परिसरात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी लाईन टाकण्यात आली पण त्याच्यावरील लोखंडी जाळ्यांची झाकणे तुटल्याने रात्रीच्या सुमारास अशा ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

इथे भरते मद्यपींची मैफल

या वसतीगृहातील विद्याथ्यांच्या सुरक्षिततेसाठी व अनुचित घटना टाळण्यासाठी तीन ते चार सुरक्षारक्षक नेमण्यात आले असतानाही रात्रीच्या वेळी मद्यपी एकत्र येऊन दारू पित आहेत.

ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर

येथील सुरक्षा रक्षक व्यवस्थाही अत्यंत ढिसाळ असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर सांडपाणी वाहून जाण्यासाठी परिसरातून ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. मात्र, ती सफाई कामगारांच्या वतीने साफ करण्यात येत नसल्याने असलेली ड्रेनेज लाईन तुंबली आहे.

वसतिगृहाच्या आवारात बसण्यासाठी बैठक व्यवस्था आहे, पण त्यांची अक्षरशः दुरवस्था आहे. या वसतिगृहाच्या आवारात झाडेझुडपे वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे लायब्ररी वा क्लासहून रात्री येथून ये-जा करणे अतिशय भीतीदायक झाले आहे. येथील सुरक्षाव्यवस्था असतानाही बाहेरील काही जण येथे येऊन दारू पित असल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने हे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
एक विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT