

पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रभागांच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे समोर आल्यानंतर आता या मतदार याद्यांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यासाठीची जबाबदारी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडे देण्यात आली असून, याबाबतचे आदेश नुकतेच निवडणूक विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.(Latest Pune News)
आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, महापालिकेकडून प्रभागांच्या मतदार यादी विभाजनाचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र, मतदार याद्यांचे विभाजन करताना काही इच्छुकांनी घुसखोरी करून त्यांना अनुकूल नसलेल्या मतदारांची नावे अन्य प्रभागात ढकलण्याचा तर अनुकूल असलेल्या शेजारील प्रभागांमधील मतदार याद्या स्वत:च्या प्रभागात लावण्याचे काही प्रकार समोर आले आहेत.
यासंबंधीचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रकाशित करीत प्रभागांमधील व्होट चोरी उघडकीस आणली होती. त्याची गंभीर दखल घेत महापालिकेच्या निवडणूक विभागाने मतदार यादी विभाजनाच्या कामाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सहाय्यक महापालिका आयुक्तांकडे प्रभागनिहाय इतर क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी सहाय्यक अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष सीमारेषा तपासून मतदार यादीतील नोंदींची शहानिशा करायची आहे. हे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करायचा आहे. यासाठी 28 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदारयादी पदनिर्देशित अधिकारी रवी पवार यांनी त्याची यादी जाहीर केली आहे.
मतदार याद्यांच्या विभाजनात अनेक ठिकाणी चुका झाल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी मतदार याद्यांची फेरपडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे मनपा