

पुणे : विविध खोदकामांमुळे पुण्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. या खड्ड्यांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून पुणे महापालिका आता “खड्डेमुक्त रस्ते अभियान” राबवणार आहे. हे विशेष अभियान 3 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, 15 पथके तयार करून सात ठेकेदारांमार्फत रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.(Latest Pune News)
महापालिकेच्या पथ विभागाकडून दरवर्षी 1 ऑक्टोबर ते 31 एप्रिलदरम्यान विविध शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांना सेवा वाहिन्या टाकण्यासाठी सशुल्क खोदाई परवानगी दिली जाते. त्यानंतर एक मेपासून खोदाई बंद करून 31 मेपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करणे बंधनकारक असते. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी पथ विभागाची असते.
मात्र, खोदाईनंतर दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जात केली जात असल्याने प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात. त्यामुळे रस्त्यांवर पावसाचे पाणी साचते, वाहतूक मंदावते आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शहरातील विविध प्रकल्प आणि विकासकामांची पाहणी करताना आयुक्त नवल किशोर राम यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचा आणि अशास्त्रीय दुरुस्तीच्या कामांचा मुद्दा गांभीर्याने घेतला. त्यानंतर त्यांनी “खड्डेमुक्त पुणे” करण्यासाठी स्वतंत्र अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या अभियानाअंतर्गत प्रत्येक पथकाला 10 ते 10 किलोमीटर रस्त्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या या कामातून ठेकेदारांना कोणताही आर्थिक फायदा होणार नाही, असेही आयुक्त राम यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या पथ विभागाने या मोहिमेची तयारी पूर्ण केली असून, नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीचा अनुभव देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.