

सोमेश्वरनगर : एकीकडे कर्जमाफीबाबत जून 2026 पर्यंत निर्णय घेऊ, असे आश्वासन राज्य शासनाने गुरुवारीच दिले असताना शुक्रवारी (दि. 31) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी कर्ज भरावे, असे आवाहन केले.(Latest Pune News)
“राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. मात्र, शेतकऱ्यांनी शून्य टक्के व्याजदराने घेतलेली कर्जे वेळेवर फेडावीत. ’सारखं कर्जमाफ करा, कर्जमाफ करा’ असं मागणं योग्य नाही. प्रत्येक वेळी माफी द्यायला हजारो कोटी रुपयांची गरज असते. शेतकरी कर्जफेड करीत नाहीत म्हणून बँका अडचणीत येतात. त्यामुळे कर्जफेड ही प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी आहे,” अशा स्पष्ट शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना सुनावले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ शुक्रवार (दि. 31) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, माजी सभापती प्रमोद काकडे, नीता फरांदे, संभाजी होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.
आम्हाला निवडून यायचे होते, म्हणून कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, असे पवार यांनी सांगितले. पवार म्हणाले, सोमेश्वर कारखाना दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त दर देईल. ‘सोमेश्वर’ने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. मात्र, मी सध्या उचल जाहीर करणार नाही.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण शेतकऱ्यांच्या हिताला धरूनच होणार असून, विहिरींच्या पाण्यावर त्याचा परिणाम होणार नाही. जानाईड्ढशिरसाई योजना सुरू झाल्यावर ऊसक्षेत्र वाढेल. ‘सोमेश्वर’च्या कार्यक्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा. मंदार कुलकर्णी यांच्या सॉफ्टवेअर कंपनीसोबत सोमेश्वर कारखान्याने एआय तंत्रज्ञान करार केला आहे. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी हंगामाचा आढावा घेतला. उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आभार मानले.