पुणे

हे शिवाजीनगरचे मेट्रो स्टेशन…? नव्हे हा तर किल्लाच..!

अमृता चौगुले
  • शिवाजीनगरला साकारणार महाराजांच्या स्थापत्यकलेचा आविष्कार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक किल्ले जिंकले, अनेक किल्ले नव्याने घडविले. त्यांची किल्ले उभारणीची स्थापत्य कला वेगळीच होती. त्या कलेची अनुभूती आता पुणेकरांना भविष्यातही घेता येणार आहे. कारण महामेट्रोकडून शिवाजीनगर मेट्रो स्टेशन ऐतिहासिक किल्ल्याप्रमाणे साकारण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवकाळातील पाऊलखुणा पुणेकरांना पाहता येणार आहेत.

सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पुणे शहरात महामेट्रोने यापूर्वीच बनविण्यात येत असलेल्या अनेक स्थानकांची रचना ऐतिहासिक केली आहे. यात डेक्कन, संभाजीनगर स्थानकाला सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पगडीची रचना असून, आता शिवाजीनगर स्थानकाची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याप्रमाणे असणार आहे.

अशी आहे शिवाजीनगर मेट्रो स्टेशनची रचना

शिवाजीनगर मेट्रो स्टेशन पूर्णत: जमिनीखाली असणार आहे. 24 बाय 140 मीटर जमिनीखाली या मेट्रो स्थानकाचा आकार असून, या स्थानकात जाण्यासाठी तीन प्रवेशद्वार असणार आहेत. या प्रवेशद्वारालाच महामेट्रो ऐतिहासिक स्वरूप देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे बुरुज आणि अवाढव्य प्रवेशद्वार पुणेकरांना आगामी काळात लवकरच पाहायला मिळेल.

''छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांप्रमाणे शिवाजीनगर स्टेशन साकारण्यात येणार आहे. पुण्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन महामेट्रोकडून हे स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच पुणेकरांना ते पाहायला मिळेल.''
                                                                                                                    – हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

हेही वाचा

SCROLL FOR NEXT