मी अनिल देशमुखांना पैसे दिले नाहीत; चांदीवाल आयोगासमोर वाझेची साक्ष | पुढारी

मी अनिल देशमुखांना पैसे दिले नाहीत; चांदीवाल आयोगासमोर वाझेची साक्ष

मुंबई, पुढारी ऑनलाईन : चांदीवाल आयोगासमोर वाझेची साक्ष  झाली. १०० कोटी खंडणी वसुली प्रकरणात चांदीवाल आयोगासमोर मंगळवारी सचिन वाझे याची साक्ष झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी करण्यात आली. यावेळी अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले.

यावेळी वाझे याने आपण अनिल देशमुख यांना कधीही पैसे दिले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण अनिल देशमुख यांच्या कोणत्याही सहकाऱ्यांनाही पैसे दिले नसल्याचे सांगितले. परमबीर सिंग यांच्यानंतर वाझे यानेही देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत उत्तर दिल्याने हे प्रकरण निकालात काढले जाण्याची शक्यता आहे.

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनाही अटक केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून खंडणी गोळा केली जात असल्याचा आरोप केला होता. मात्र, चांदीवाल आयोगासमोर परमबीर सिंग यांनी आपल्याकडे तसे कोणतेही पुरावे नसल्याची कबुली दिली. आता सचिन वाझे यानेही पैसे न दिल्याचे सांगितल्याने देशमुख यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध करण्यात ते यशस्वी होतील असे बोलले जात आहे.

परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यानंतर ईडीचा ससेमिरा चुकविण्यासाठी देशमुख काही काळ अज्ञातवासात होते. परमबीर सिंग हेही गायब होते. देशमुख ईडी चौकशीला सामोरे गेल्यानंतर त्यांना कोर्टाने कोठडी सुनावली होती.

चांदीवाल आयोगासमोर वाझेची साक्ष : १८९५ पानांचे आरोपपत्र

मुबंई गुन्हे शाखेने सचिन वाझे आणि माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी कोर्टात १८९५ पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात काही अधिकारी आणि हवालदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी, खंडणीसाठी बारमालकांना धमकावण्यासाठी सचिन वाझे दबाव आणत असल्याचे म्हटले. खंडणी गोळा करायला नकार दिला तर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला नोकरी घालवण्याची भीती घातली जात असे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने खंडणीवसुली रोखण्याचा प्रयत्न केला तर सचिन वाझे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे तक्रार करेन, असे सांगायचा, असे जबाब पोलिसांनी दिले होते.

हेही वाचा : 

Back to top button