New Voters Impact Pudhari
पुणे

New Voters Impact: सासवडमध्ये नवमतदारांची लाट! 33 हजार 656 मतांनी कोणाचे गणित बिघडणार?

शहरात झपाट्याने वाढलेली मतदारसंख्या; नव्या मतदारांचा कल कोणाकडे? पक्षांमध्ये दावे-प्रतिदावे, 11 प्रभागांमध्ये जबरदस्त स्पर्धा

पुढारी वृत्तसेवा

अमृत भांडवलकर

सासवड: सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. उमेदवारी नामनिर्देशपत्र दाखल करणे, अर्जाची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत्त, चिन्ह वाटप यानंतर केवळ 5 दिवस प्रचारासाठी राहिले आहेत. आठ वर्षांत शहरातील राजकीय वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्या स्थितीत हे नवमतदार कोणाला मतदान करणार, त्याचा फायदा कोणत्या पक्षाला व उमेदवारांना होणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

सासवड शहरातील मतदारसंख्या वाढल्याने आता सासवड नगरपालिकेत 11 प्रभागामधून 22 सदस्य निवडून जाणार असून, नगराध्यक्षपद थेट जनतेमधून निवडले जाणार आहे. सासवडमध्ये एकूण मतदारसंख्या 33 हजार 656 इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदार 16 हजार 818 तर स्त्री मतदारसंख्या 16 हजार 838 इतकी आहे. या निवडणुकीत महिलांचे 50 टक्के आरक्षण असल्याने 11 जागा राखीव आहेत.

सासवड शहरात वेगवेगळ्या कारणांनी नागरिक वास्तव्यास येण्याचे प्रमाण मोठे आहे. काम, व्यवसाय, नोकरी, शिक्षण आदींसाठी शहरात राहण्यास पसंती दिली जात आहे. पुण्याला जोडणारे हे सासवड शहर असल्याने येथे राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. शहरात नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक, 18 वर्षे पूर्ण झालेले युवक व युवती, विद्यार्थी, परप्रांतीय कामगार व मजूर, कुटुंबातील सदस्य वाढल्याने ते शहरात इतरत्र स्थायिक होत आहेत, आदी विविध कारणांमुळे मतदार संख्याही वाढत आहे.

पुरंदर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेले सासवड शहर अत्यंत झपाट्याने विकसित होत आहे. सासवडकरांनी निर्णय घेतल्यास कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून येतो, असे काहीसे चित्र अद्याप टिकून असल्याचा दावा केला जात आहे. बाहेरून आलेल्या अनेक मंडळींनी शहरात मानाचे स्थान मिळविले आहे, असे विविध निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. नवमतदार हे कोणाच्या बाजूने कौल देणार, याची उत्सुकता लागली आहे. प्रभागातील त्या मतांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच, ती मते आपल्याकडे खेचण्यासाठी काही इच्छुकांनी संपर्क मोहीम राबविली आहे.

सन 2017 ते 2022 या पंचवार्षिकत नगरसेवकांचा प्रभागात तसेच, मतदारांशी दांडगा संपर्क होता. मात्र त्यानंतर निवडणुका न होता, त्या पुढे ढकलल्या गेल्याने माजी नगरसेवक व मतदारांमधील संपर्क तुटला आहे. तसेच, पराभूत उमेदवारांशिवाय नव्या पिढीतील अनेक इच्छुक निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. परिणामी स्पर्धकांची संख्या वाढली आहे. लोकवस्ती वाढल्याने मतदार संख्येत भर पडली आहे. त्यांना माजी नगरसेवकांनी केलेल्या कामांची माहिती नाही. ती वाढलेली मते कोणाच्या झोळीत पडणार, कोणाला त्याचा फटका बसणार, यावरून गणिते मांडली जात आहेत.

बारामती पालिकेसाठी रविवारी 33 अर्ज दाखल

बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी रविवारी (दि. 16) नगराध्यक्षपदासाठी चार, तर नगरसेवकपदासाठी 29 असे 33 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर आणि सहाय्यक अधिकारी पंकज भुसे यांनी दिली. पालिकेसाठी रविवारअखेर आता नगराध्यक्षपदासाठी 6, तर सदस्यपदासाठी 53, असे एकूण 59 अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (दि. 17) दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यामुळे सोमवारी बारामतीत विक्रमी संख्येने अर्ज दाखल होतील, अशी चिन्हे आहेत.

दौंड नगरपालिकेसाठी 28 जणांचे अर्ज

दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 17) 28 उमेदवारांनी नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर एक अर्ज नगराध्यक्षासाठी प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नील प्रसाद चव्हाण व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अवधूत तावडे यांनी दिली. सोमवार (दि. 17) हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. अद्याप नागरिक हित संरक्षण मंडळ-भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांकडून नगराध्यक्षपदाचे नाव जाहीर केलेले नाही. राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटाने देखील नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. सोमवारीच आता याचा फैसला होणार आहे. दौंड नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT