

ज्येष्ठ राजकारणी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराचे प्रवक्ते, माजी महापौर, म्हाडाचे माजी अध्यक्ष... अशी अंकुश काकडे यांची ओळख. पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात अण्णा या नावाने ते सुपरिचित. महानगरपालिकेच्या अनेक निवडणुका त्यांनी लढविल्या; पण त्यांच्या आठवणीत राहिली ती 1992 ची दमछाक करणारी निवडणूक....
त्या विषयीच्या आठवणी त्यांच्याच शब्दांत...
नवी पेठ, लोकमान्यनगर, विजयानगर, दांडेकर पूल या परिसरातून 1985 साली समाजवादी काँग््रेास पक्षाच्या ‘चरखा’ या चिन्हावर मी महापालिकेवर निवडून आलो. शरद पवार यांच्यामुळे 1988 मध्ये पहिल्याच टर्ममध्ये मला महापौरपदाची संधी मिळाली. महापौरपदाच्या कारकिर्दीत चांगली कामे करण्याची संधी मिळाली. त्याला वर्तमानपत्रांनीही भरभरून प्रसिद्धी दिल्याने शहरात माझी प्रतिमा उंचावली. 1985 साली 5 वर्षांसाठी निवडून आलो असलो, तरी ही टर्म आणखी 2 वर्षे एक्स्टेंड झाली.
मॉडेल कॉलनी परिसरातून निवडून आलेले माझे चुलत सासरे प्रमोद महाले हेही माझ्यासोबत महापालिकेत होते. 1992 मध्ये शरद पवार यांच्या सरकारने महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे माझा नवी पेठ वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला. याचदरम्यान चुलत सासरे प्रमोद महाले यांचे निधन झाले. मॉडेल कॉलनी परिसरातील त्यांचा वॉर्ड सर्वसाधारण गटासाठी खुला होता. महाले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर मी उभे राहावे, अशी सूचना सासरकडील मंडळी करीत होते. मात्र, हा निर्णय कुटुंबीयांनी चर्चा करून घ्यावा, अशी भूमिका मी घेतली होती. परंतु, नंतर आपल्याच कुटुंबातील कोणीतरी ही निवडणूक लढवावी, असा निर्णय महाले कुटुंबीयांनी घेतला. (प्रमोद महाले यांच्या अकाली निधनामुळे मतदारांची सहानुभूती मिळेल, असे त्यांना वाटत होते.) म्हणून महाले यांचे पुतणे प्रशांत यांची उमेदवारी त्यांनी जाहीर करून टाकली.
प्रमोद महाले यांना दोन निवडणुकांचा अनुभव होता. त्यामुळे त्यांचा चांगला संपर्क होता. परंतु, त्यांच्या पश्चात इतर कोणी फारसे कार्यरत नव्हते. मॉडेल कॉलनी हा वॉर्ड संमिश्र वस्तीचा भाग. सोसायट्या, बंगले, झोपडपट्ट्या, गरीब, श्रीमंत, उच्चशिक्षित असे सर्व स्तरांतील लोक येथे होते. त्यामुळे सर्वत्र वावर असलेला उमेदवार येथे दिला पाहिजे, या विचाराने काँग््रेासने माझी उमेदवारी जाहीर करून टाकली. पक्षाच्या निर्णयामुळे माझी मोठी कुचंबणा झाली. वॉर्डची एकंदरीत परिस्थिती पाहता प्रशांत महाले हे अतिशय नवखे कार्यकर्ते तसेच वॉर्डात भाजपचे वर्चस्व असलेला बराच भाग, त्यामुळे प्रशांत यांनी निवडणूक लढवू नये, असे मी सुचविले. परंतु, त्यांनी ते ऐकले नाही. परिणामी काँग््रेास, भाजप, शिवसेना आणि अपक्ष अशी लढत झाली. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्यांमध्ये त्या भागाची माहिती नसलेला मी एकमेव उमेदवार होतो. इतर सात-आठ उमेदवार हे स्थानिक होते, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची भलीमोठी फौज, तर माझ्याकडे अगदी हाताच्या बोटावर मोजावे इतकेच कार्यकर्ते, अशी परिस्थिती होती.
माझ्या जुन्या वॉर्डातून मी वंदना चव्हाण यांना उभे केले होते. पण, श्याम मानकर यांनी अचानक नवी पेठेतील गीता परदेशी या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने वंदना चव्हाण यांची जागाही अडचणीत आली. त्यांची इच्छा नसताना उमेदवारीसाठी मी त्यांना भरीला घातले होते. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली होती. त्यामुळे नवी पेठेतील माझ्या सर्व कार्यकर्त्यांवर मी त्यांच्या प्रचाराची जबाबदारी दिली. माझ्या कुटुंबातील माझी पत्नी, थोरले बंधू आणि वहिनी सोडून इतर सर्वांनी माझा प्रचार न करता वंदनाचा प्रचार करावा, अशी सक्त ताकीदच मी दिली. इकडे माझ्या वॉर्डात तर वेगळेच चित्र होते. महाले यांच्याकडे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे, भाजपची शिस्तबद्ध यंत्रणा, अपक्ष उमेदवार शिळीमकर यांना गव्हर्मेंट कॉलेजच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे पाठबळ, अपक्ष उमेदवार सुनील कुसाळकर यांच्यामागे वडार समाज, चाफेकरवस्तीतील अपक्ष उमेदवार मारुती साळेगांवकर यांच्याकडे स्थानिक कार्यकर्त्यांची फौज होती. मला मात्र या वॉर्डाचे कार्यकर्तेच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था या सर्वांनी केली होती.
एवढेच काय, कार्यालयासाठी वॉर्डात मला जागा देखील मिळू द्यायची नाही, अशी व्यवस्था त्यांनी केली. अशा प्रतिकूल परिस्थितीत तेथील नंदू पवार, मनोहर कांचन, संभाजीराव भोसले, सुरेंद्र गांधी, डी. बी. कदम, राजेश कारंडे, श्याम पवार, भास्कर श्रोत्री अशा मोजक्या कार्यकर्त्यांनी मला मनापासून साथ दिली. विरोधकांच्या प्रचारात विकासाचा मुद्दा नव्हता. ‘अंकुश काकडे सोडून कुणालाही मत द्या, नवी पेठेतील पार्सल नवी पेठेत परत पाठवा’ एवढाच प्रचार ते करीत होते. त्या वेळी फ्लेक्स नव्हते. हाताने पेंट केलेले बोर्ड असायचे, ते तयार करण्यासाठी सात-आठ दिवस लागायचे. माझे बोर्डतर रातोरात फाडले जायचे. दुसऱ्या रात्री लगेच महालेंचा बोर्ड फाडला जाई, असे तीन-चार ठिकाणी झाले. आम्हाला वाटे महालेंच्या कार्यकर्त्यांचा हा उद्योग असावा, तर महालेंना वाटे काकडेंचे कार्यकर्तेच आपले बोर्ड फाडताहेत. मग एका रात्री आम्ही पाळत ठेवली व बोर्ड फाडणाऱ्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तेव्हा समजले की, भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा उद्योग होता.
काँग््रेासच्या दृष्टीने माझी निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. कारण, त्यांचा उमेदवार एक माजी महापौर होता आणि माझ्याबरोबर मात्र प्रचार करताना 3-4 कार्यकर्ते असायचे, इतर उमेदवारांकडे मात्र 15-20 कार्यकर्त्यांची फौज असायची. त्यामुळे माझी सिट गेली, असा पोलिस रिपोर्ट होता. तेथे राहणाऱ्या विठ्ठलशेठ मणियार यांच्याकडून साहेब रोज अपडेट्स घेत असत. त्यामुळे मी निवडून येणार, अशी त्यांना खात्री होती. मी प्रचारासाठी जात असे, तेथील कुटुंबीय आनंदाने माझे स्वागत करीत. कारण, माझ्या महापौरपदाची कारकीर्द त्यांनी पाहिली होती. मतदारांच्या अशा प्रतिसादामुळे पहिल्या फेरीतच माझा विजय निश्चित झाला होता.
निवडणुकीचे मतदान 3 मतदान केंद्रांवर होते. या तीनही ठिकाणी स्थानिक उमेदवार आपापले मतदान करून घेत होते. (त्या वेळी टी. एन. शेषन नव्हते) त्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत मी चिंतेत होतो. पण, त्यानंतर सुरू झालेले मतदान हे माझ्या बाजूने होते, मतदान केंद्रावर आम्ही सर्व उमेदवार एकाच ठिकाणी उभे होतो. मतदान करून परतणारा प्रत्येक जण जाताना, काकडे दिले हा तुम्हाला मत, असे सांगायचा. त्यामुळे माझा जीव भांड्यात पडला होता. मतदानाच्या दिवशीच सायंकाळी मतमोजणी सुरू झाली, त्या वेळी प्रत्येक भागासाठी वेगळी मतपेटी होती. त्यामुळे ती कोणत्या भागातील मते मोजली जात आहेत, हे समजत होते. परिणामी, कुठल्या भागाने कोणाला पाठिंबा दिला, हे इतर उमेदवारांना कळत होते. मला मात्र त्याची फारशी कल्पना नव्हती. त्यामुळे कोणत्या पेटीत मला किती मते मिळतील, याचा अंदाज येत नव्हता.
प्रत्यक्षात मतमोजणीस सुरुवात झाली. एकूण 8 पेट्या होत्या, पहिल्या पेटीत मी आघाडीवर, दुसऱ्या पेटीत तू मागे पडशील, असे इतर उमेदवार मला सांगायचे. प्रत्येक पेटीच्या मतमोजणीच्या वेळी व्हायचे. प्रत्येक वेळी मी आघाडी घ्यायचो. अगदी शेवटच्या 8 व्या फेरीपर्यंत ही परिस्थिती कायम होती. पण, शेवटी निकाल जाहीर झाला आणि मी 760 मताधिक्याने निवडून आलो.