

शिरूर: शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवाीर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिरूर शहरात राजकीय अस्तित्वामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. रविवार (दि. 16) पर्यंत कुठल्याच राजकीय पक्षांनी एबी फॉर्म न दिल्यामुळे इच्छुक उमेदवारांची प्रचंड धावपळ उडाली आहे.
शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश धारिवाल यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राजकीय अनिश्चितता निर्माण झाली असून यामुळे प्रथमच शिरूर शहरात पक्षाचे नाव व चिन्हावर निवडणूक होत आहे.
मात्र या सर्व राजकीय गोंधळात अनेक पक्षातील इच्छुक दुसऱ्या पक्षात दाखल झाले असून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. निष्ठावंत, प्रामाणिक हा शब्द या निवडणुकीत फार लांब गेला असून जो-तो आपल्या सोयीनुसार आपल्या परिसरात पक्ष निवडत आहे. असे असताना महायुती किंवा महाविकास आघाडीकडून अद्यापपर्यंत एकही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.
शिरूरमधील भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने अधिकृत कुठलीही घोषणा झालेली नाही, तसेच आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून देखील आतापर्यंत निवडणूक लढविण्यासंदर्भात कुठलीही भूमिका घेतली गेलेली नाही. शिवसेना पक्षाकडून देखील अधिकृत वक्तव्य आलेले नाही. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष एकमेकांशी लढणार की महायुती म्हणून लढणार हे दि. 21 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होईल
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), काँग््रेास आय यांच्यात चर्चा सुरू असून माजी आमदार अशोक पवार जो निर्णय घेतील, त्याला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार आहे; मात्र शिरूर नगरपरिषदेच्या इतिहासामध्ये प्रथमच उमेदवारांची प्रचंड ससेहोलपट पहावयास मिळत असून प्रकाश धारिवाल यांनी निवडणुकीतील हात काढल्यानंतर प्रचंड प्रमाणात राजकीय गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात पक्षाकडून कोणालाच उमेदवारी जाहीर झाली नसून एबी फॉर्म अद्यापपर्यंत कुठल्याच पक्षांनी कोणत्याही उमेदवाराला दिलेले नाहीत. सद्य:स्थितीत 24 जागांसाठी 62 उमेदवार यांनी अर्ज दाखल केले आहेत.