सासवड नगराध्यक्षपदासाठी आतापासून ‘लॉबिंग’ Pudhari
पुणे

Saswad Nagarparishad election: सासवड नगराध्यक्षपदासाठी आतापासून ‘लॉबिंग’; आरक्षणाने इच्छुकांना धक्का

महत्वाच्या पदासाठी माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून पक्ष वरिष्ठांकडे जोरदार लॉबिंग; महिला आरक्षणामुळे राजकीय घडामोडी वेगाने

पुढारी वृत्तसेवा

सासवड : पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीमुळे सासवडच्या राजकारणात वेगाने घडामोडी सुरू झाल्या आहेत. प्रमुख पक्षातील अनुभवी माजी नगरसेवक व पदाधिकारी हे तिकिटापासून महत्त्वाच्या पदासाठी आतापासून पक्षाच्या वरिष्ठांकडे ‌’लॉबिंग‌’ करत असल्याची चर्चा आहे. यासाठी स्थानिक, तसेच मर्जीतील नेत्यांकडे आग्रह धरला जात आहे.(Latest Pune News)

आरक्षणात आपला ‌’सेफ‌’ प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक दिग्गज इच्छुकांना धक्का बसला आहे. त्यामुळे अनेक जण कुटुंबातील महिलेला रिंगणात उतरवण्याची तयारी करत आहेत, तर काही जण दुसऱ्या प्रभागाची चाचपणी करत आहेत. यामुळे वरिष्ठांकडे अनेकांच्या चकरा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोण, कोठून पुढे येणार याची उत्सुकता शहरात वाढली आहे.

फेबुवारी 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने पालिकेवर माजी आमदार दिवंगत चंदुकाका जगताप आणि तत्कालीन माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बाजी मारली होती. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातच प्रमुख स्पर्धा होती. माजी आमदार संजय जगताप, तसेच आमदार विजय शिवतारे यांनी शिफारस केल्यानुसार नगराध्यक्ष व इतर महत्त्वाच्या पदावर आपल्या मतदारसंघातील नगरसेवकांना संधी दिली गेली. त्यांनी दिलेल्या नावांवर वरिष्ठांकडून शिक्कामोर्तब केले जात होते.

आता काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या संजय जगताप यांची यंदाच्या निवडणुकीतील भूमिका निर्णायक ठरेल, असे मानले जात आहे. भाजपची ताकद वाढल्याने त्यांची भूमिका काय असेल, यावर निवडणुकीचे चित्र ठरेल. राजकीय उलथापालथींमुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपचे माजी आमदार संजय जगताप आणि शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांच्यातील वैरामुळे युतीची शक्यता नाकारली जाते. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी करीत असून, गेल्या वर्षभरापासून तयारी चालू आहे. परिणामी, प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची मोठी संख्या असल्याची चर्चा आहे

गेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा आतापासूनच अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुक तिकिटासाठी ‌’फिल्डींग‌’ लावून आहेत. नगराध्यक्ष व इतर प्रमुख पदांसाठी अनेक जणांनी शहरातील लोकप्रतिनिधींपासून वरिष्ठ नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांकडे जोर लावला आहे. त्या पदासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपली नावे पुढे केली जात आहेत. ‌’मी कसा योग्य‌’ हे नेत्यांना समजावून सांगितले जात आहे. तसेच, पक्षातील विरोधातील प्रबळ इच्छुकाला पद मिळू नये यासाठीही ‌’फिल्डींग‌’ लावून अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे.

नगराध्यक्षपदासाठी सत्तेतील भाजपा तसेच, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात अनेक जण इच्छुक आहे. तसेच, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), काँग्रेस व इतर पक्षांतील इच्छुकही त्या मानाच्या पदासाठी तयारी करीत आहेत. ते मानाचे पद मलाच मिळायला हवे. दांडगा अनुभव, पक्षासाठी केलेली कामे पाहता पद हवे, अशी आग्रही मागणी स्थानिकपासून राज्यपातळीवरील नेत्यांकडे केली जात आहे.

युती व आघाडीबाबत संभम

नगरपालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी एकत्रितपणे निवडणूक लढणार की स्वतंत्रपणे, याची उत्सुकता लागली आहे. लोकसभा व विधानसभेत युती व आघाडी झाली होती. महापालिका निवडणुकीत माजी नगरसेवक व इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रमुख पक्षात तर, इच्छुकांची रांग लागली आहे. त्यामुळे युती व आघाडी न करता निवडणूक लढावी, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत आहे. तसेच, वरिष्ठांकडून अद्याप स्पष्ट संकेत दिले जात नसल्याने युती व आघाडीबाबत इच्छुकांमध्ये संभम निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT