Women Commission visit Rotimala Pudhari
पुणे

Women Commission visit Rotimala: राज्य महिला आयोगाने रोटी गावात साधला संवाद; जावळ प्रथेबाबत चर्चा

शितोळे कुटुंबाच्या परंपरेविषयी माहिती घेत महिला आयोगाच्या प्रतिनिधींनी नागरिकांशी सविस्तर संवाद साधला

पुढारी वृत्तसेवा

पाटस : रोटी (ता. दौंड) येथील ग्रामदैवत रोटमलनाथ देवस्थानच्या शितोळे कुटुंबाच्या जावळ प्रथेबाबत दाखल तक्रारीमुळे रोटी गावासह परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 2) राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे व त्यांच्या प्रतिनिधींनी रोटी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत सविस्तर चर्चा केली. जावळ प्रथेबाबत विविध मुद्द्‌‍यांची माहिती घेतली.

यावेळी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, यवतचे पोलिस अधिकारी नारायण देशमुख, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव, पुणे विभागीय आयुक्त संजय माने, दौंड गटविकास अधिकारी अरुण मरकळ, रोटी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष केशव शितोळे, विधी सल्लागार आमपाली शिरसाठ, नितीन शितोळे, सत्वशील शितोळे, मोहन शितोळे, रोटी माजी सरपंच दिलीप शितोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती आशा नितीन शितोळे, कुसेगाव माजी सरपंच छाया मोहन शितोळे, कुरकुंभ पोलिस पाटील रेश्मा शितोळे, तसेच इतर महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. जावळ या प्रथेतून आमच्यावर कुटुंबातून कोणत्याही प्रकारचा दबाव, दहशत किंवा सक्ती केली जात नाही. हा आमच्यासाठी श्रद्धेचा आणि भावनिक सोहळा असून, स्वेच्छेने व परंपरेनुसार आम्ही तो पार पाडतो, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काही पुरुषांनी शितोळे घराण्याची परंपरा, त्याचा ऐतिहासिक संदर्भ आणि जावळ प्रथेची पार्श्वभूमी मांडली. या प्रथेमध्ये महिलांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार किंवा सक्ती होत नाही. अनेक वर्षांच्या या परंपरेत आजवर कुणीही विरोध दर्शवलेला नाही. तसेच कोणत्याही कुटुंबाला सामूहिक त्रास दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी रोटमलनाथ देवस्थान आणि तळेघरांची परंपरा यासंबंधी काही ऐतिहासिक नोंदींचा उल्लेखही केला.

राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी या सर्व बाजू ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी आयोगाची भूमिका स्पष्ट करून सांगितली. समाजहिताला बाधा आणणारी कोणतीही गोष्ट रुढी-परंपरेच्या नावाखाली चालू दिली जाऊ नये. तोच खरा छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. आपल्या राज्यात कायद्याच्या अनुषंगानेच निर्णय घेतले जातात. लोकशाहीला साजेसे वातावरण टिकवणे हाच महिला आयोगाचा उद्देश आहे. याबाबत नागरिकांनी कोणतेही गैरसमज करून घेऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

जावळाच्या जेवणाला या!

राज्य महिला आयोगाच्या प्रतिनिधींनी भेट दिली, त्यावेळी गावात एक जावळाचा कार्यक्रम होता. त्यावेळी चर्चा करताना संबंधित कुटुंबाने आयोगाच्या प्रतिनिधींना जावळाच्या जेवणाचे आमंत्रण दिले. त्यामुळे या भेटीदरम्यान एक आगळा-वेगळा प्रसंग महिला आयोगाला अनुभवयास मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT