

लोणावळा : पुण्यातील बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा मृतदेह लोणावळ्यातील टायगर पॉईंट येथील दरीमध्ये मिळून आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस व शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकाच्या मदतीने सुमारे 400 ते 450 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
परेश सूर्यकांत हटकर (38, रा. सकाळनगर, बाणेर रोड, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवार (दि. 2) रोजी घडली असून, मोबाईल लोकेशनच्या आधारे शनिवारी सकाळी या घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी परेश हटकर यांच्या पत्नी वृषाली परेश हटकर (37) यांनी पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश हटकर हे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ‘बँकेत जाऊन येतो’ असे सांगून त्यांच्या चार चाकी वाहन क्र. (एमएच 12 एचएम 0025) घराबाहेर पडले होते; मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन लागूनही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर चतु:शृंगी पोलिसांकडे हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासले असता ते लोणावळ्यातील टायगर पॉईंट परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी सकाळी अकरा वाजता ही माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिस हवालदार गणेश अकोलकर यांनी टायगर पॉईंट येथे पाहणी केली असता तिथे परेश हटकर यांची वेरना कार आढळून आली. त्यानंतर शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले.
दुपारी अडीचच्या सुमारास शोधमोहीम सुरू करण्यात आली. श्रुती शिंदे, योगेश उंबरे, सचिन गायकवाड, कुणाल कडू, महेश मसने, आनंद गावडे, सागर कुंभार, योगेश दळवी, सागर दळवी, अथर्व दळवी, गणेश म्हसकर व संतोष मरगळे यांच्या अथक प्रयत्नानंतर दरीत सुमारे 400 फूट खाली मृतदेह आढळून आला. दोन तासांच्या मेहनतीनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, या घटनेचा तपास लोणावळा ग्रामीण व चतु:शृंगी पोलिस करीत आहेत.