

पुणे : बदलीसाठी तीन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.
रामकिसन गंगाधर घ्यार (वय 43) असे अटक करण्यात आलेल्या आरोग्यसेवकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका आरोग्य सेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार हे आरोग्य सेवक आहेत. जून 2025 मध्ये त्यांची आरोग्य कार्यालय, उपसंचालक, कोल्हापूर येथील कार्यालयातून पुणे विभागात बदली झाली होती. मात्र, पुणे विभागात नियुक्ती न करता त्यांना आरोग्यसेवक पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव येथे रिक्त पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी बदलीचा अर्ज केला होता.
या प्रकरणात उपसंचालक आरोग्य, पुणे मंडळ कार्यालयातील आरोग्य अधिकाऱ्याच्या संपर्कात आरोपी रामकिशन घ्यार होता. बदलीचे काम करून देण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने 2 डिसेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शुक्रवारी (2 जानेवारी) जिल्हा परिषद कार्यालयासमोरील रस्त्यावर सापळा लावण्यात आला. घ्यार याने तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेतली. लाच घेताना त्याला पकडण्यात आले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.