राजकीय कट असल्याचा दावा Pudhari
पुणे

Vadgaon Sheri MLA attack: “माझ्यावर हल्ला पूर्वनियोजितच होता” – आ. बापूसाहेब पठारे यांचा आरोप

राजकीय कट असल्याचा दावा; खांदवे यांनी फेटाळले आरोप, CCTV चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वडगाव शेरी : महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने माझ्यावर हल्ला करण्यात आला. तो पूर्वनियोजित होता. घटनास्थळी दोन मिनिटात शंभर लोक जमतात, यावरूनही हेच स्पष्ट होते. या प्रकारात माझा ड्रायव्हर आणि अंगरक्षक हे दोघेही जखमी झाले. माझ्या पुतण्यालादेखील मारहाण झाली, असा आरोप वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी रविवारी (दि. 5) पत्रकारांशी बोलताना केला.(Latest Pune News)

दोन व्यक्तींमधील वाद हा खराडी आणि लोहगावचा असल्याचा दाखवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले. लोहगाव येथील गाथा लॉन्स येथे माजी सैनिकांच्या सत्कार कार्यक्रमानंतर माजी सभापती बंडू खांदवे आणि आमदार पठारे यांच्यामध्ये स्थानिक मुद्द्‌‍यांवरून शाब्दिक वाद झाला. त्यातून त्यांच्यात धक्काबुक्की सुरू झाली. शनिवारच्या या घटनेची माहिती पठारे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे, सुरेंद्र पठारे, राजेंद्र खांदवे आदी उपस्थित होते.

पठारे म्हणाले, लोहगावमध्ये बंडू खांदवे आंदोलन करणार होते. मी त्यांना व्हॉट्‌‍सॲपवर विकास-कामांबद्दल मेसेज केला होता. कार्यक्रमानंतर त्यांनी सांगितलं की, मी आंदोलन करणार आहे. तुम्ही विरोध का करता?, असे म्हणत त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी माझा चालकमध्ये आला असता त्यालाही मारले. माझ्या अंगरक्षकालादेखील मारहाण केली. रात्री उशिरा हा प्रकार झाला. याबाबत तक्रार देण्यासाठी रात्री पोलिस ठाण्यात गेलो होतो; पण जबाब नोंदवला गेला नाही. याबाबत आता गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

लोहगावमधील अंतर्गत रस्ते डिसेंबर 2023 मध्येच मंजूर होते; पण त्यांनी रस्ते केले नाहीत. रस्ता करण्यापूर्वी पाइपलाइन आणि ड्रेनेज टाकावे लागते. ते काम करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत; पण, त्यांनी रस्त्याचे काम सुरू झाले नाही, यावरून आंदोलन करून राजकारण करण्याचा हा प्रकार करत होते म्हणून हे सगळे घडले. आंदोलन करणार म्हणून आम्ही शिव्या दिल्या नाहीत. सगळे आंदोलन करू शकतात. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमच्यावर हल्ला करून वेगळे वातावरण तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अजित पवार यांच्याकडे देखील मी याबाबत तक्रार करणार आहे. मारहाण करणाऱ्यांवर ठोस कारवाई झाली पाहिजे.

हा कट मी नव्हे, तर त्यांनीच रचला : बंडू खांदवे

माझे आंदोलन प्रशासनाच्या विरोधात होते. आमदार बापूसाहेब पठारे यांनी हे आंदोलन स्वतःवर घेतले. त्यांनीच माझ्या व्हॉट्‌‍सॲप मेसेजला रिप्लाय दिला होता. कार्यक्रमात दिसल्यानंतर त्यांनी मला प्रथम विचारणा केली आणि त्यानंतर शिवीगाळ केली. त्यांच्या ड्रायव्हरने मला मारले. त्यानंतर मी स्वत:ची सुटका करताना धक्काबुक्की झाली. हा पूर्वनियोजित कट असता, तर मी एकटा आलो नसतो. मी जनआक्रोश आंदोलन करत असल्याचे त्यांना पटले नाही. सुरेंद्र पठारे हे चार ते पाच हजार लोक घेऊन त्या ठिकाणी आले असल्याचे सांगतात. त्यामुळे हा कट मी नव्हे, तर त्यांनीच रचला होता. मात्र, तरीही मी आमदार बापूसाहेब पठारे यांचा आदर करतो, असे बंडू खांदवे यांनी सांगितले.

घटना घडली त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. फुटेज पाहिल्यानंतर खुलासे होतील. बंडू खांदवे यांनी पॉलिटिकल स्टंट केला. त्यांनी नंतर सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची शहानिशा सीसीटीव्हीमार्फत होईल. पोलिसांनी ते सगळं ताब्यात घेतलं आहे. -
सुरेंद्र पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT