

पुणे : महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेनंतर आता अंतिम प्रभागरचनेवरही सत्ताधारी भाजपचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. अंतिम रचनेत ज्या प्रभागांच्यारचनेत बदल झाले तेही भाजपला अनुकूल ठरणार असून आरडाओरड करूनही राष्ट्रवादी काँग्रेसला हरकती-सूचनांनंतरही पुन्हा ठेंगा दाखविण्यात आल्याचे अंतिम रचनेवरून स्पष्ट झाले आहे.(Latest Pune News)
राज्यात महायुतीच्या सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीनही घटक पक्षांना प्रभागरचनेत झुकते माप मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, प्रारूप प्रभागरचनेत भाजपने आपल्या सोयीनुसार बदल केल्याचे आरोप विरोधकांसह भाजपच्या मित्र पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व शिवसेनेनेदेखील केले होते. प्रभागरचना तयार करताना नदी, नाले, डोंगर या नियमाला डावलले असल्याचा आरोपदेखील केला होता.
प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर ही रचना पूर्णपणे भाजपला अनुकूल ठरणारी असल्याचे दिसून आले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला होता. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत तीव शब्दात नाराजी केली होती. त्यामुळे अंतिम रचनेत किमान राष्ट्रवादीच्या काही प्रमुख पदधिकाऱ्यांच्या प्रभागांच्या रचनेत बदल करून त्यांना अनुकूल रचना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आता अंतिम रचनेतही पुन्हा प्रभागरचनेवर भाजपचाच वरचष्मा राहिला असल्याचे दिसून येत आहे.
त्यात वडगाव शेरी मतदारसंघात प्रभाग क्र. 4, खराडी-वाघोली या प्रभागातील थिटे वस्ती प्रारूप रचनेत नदी ओलांडून केशवनगर-मुंढवा प्रभागाला जोडण्यात आली होती. मात्र, हरकती-सूचनानंतर आता ही वस्ती पुन्हा वस्ती प्रभाग 3 मध्ये समाविष्ट केली आहे. या प्रभागावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य या प्रभागात निवडणूक लढविणार आहे. मात्र, पठारे कुटुंबातील निवडणूक लढवू इच्च्िछत असलेले सदस्य भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवरच हा प्रभाग पुन्हा थिटे वस्ती जोडण्यात आला आहे.
प्रभाग क्र. 14 कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा या प्रभागात अंतिम रचनेत केलेला बदल भाजपसाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय प्रभाग 20 मधून काही भाग वगळून तो प्रभाग क्र. 21 मध्ये समाविष्ट केला आहे. त्यामुळे या दोन प्रभागांवर भाजपचे वर्चस्व आहे. धनकवडी भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या प्रभागाचे तीन तुकडे झाल्याचे आरोप केले होते. आता ते इच्छुक असलेल्या प्रभाग क्र. 39 मध्ये राजस सोसायटी, सुखसागर नगर हा भाग जोडण्यात आला आहे. मात्र, यामधील बहुतांश भाग भाजप इच्छुक नको असल्यानेच तो वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रामुख्याने सत्तेत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, आमदार चेतन तुपे यांच्यासह हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी या मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी प्रभागरचनेबाबत जे काही आक्षेप घेतले होते. त्यात अंतिम रचनेत कोणतेही बदल होऊ शकलेले नाहीत. एकंदरीतच अंतिम रचनेतही विरोधी पक्षांनी केलेल्या हरकती- सूचनांना केराची टोपली दाखविली आहे.
राष्ट्रवादीतील फूट वडगाव शेरी, हडपसरमध्ये भाजपच्या पथ्यावर
कोथरूड, पर्वती, शिवाजीनगरमधील विधानसभा मतदारसंघातील प्रभागांची संख्या कमी होणार नाही, याची काळजी घेतल्याचे प्रभाग रचनेत दिसते. यावर अंतिम प्रभागरचनेत शिक्कामोर्तब झाले आहे. कोथरूड मतदारसंघातदेखील हीच स्थिती आहे. वडगाव शेरी, हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी फुटल्यानेही त्यांच्यात लढत होणार असल्याने याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची ताकद फक्त तीन प्रभागांपुरती
कॉंग्रेसची ताकद फक्त तीन प्रभागांपुरती मर्यादित राहिली आहे. येरवडामधील अरविंद शिंदे यांचा प्रभाग, ताडीवाला रोड, अविनाश बागवे यांचा लोहिया नगर, काशेवाडी प्रभाग. जर महाविकास आघाडी झाली तर या प्रभागांतही महाविकास आघाडीत जागा वाटप होईल. परिणामी, कॉंग्रेसच्या नगरसेवकांवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसची शक्ती ही मर्यादित आहे. राष्ट्रवादी व शिवसेना विभागल्या गेल्याने त्यांची देखील शहरातील ताकद विखुरली गेली आहे. त्यामुळे भाजपला आव्हान देण्याची त्यांची शक्ती नाही.
दिवाळीनंतर चित्र होईल स्पष्ट
भाजपमध्ये येणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. विरोधी व मित्र पक्षातील अनेकजण भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. जर युती झाली तर कोणाला किती जागा हा मुद्दा महत्त्वाचा राहील, जर युती झाली नाही तर प्रत्येक पक्ष हा स्वतंत्र लढणार आहे. आज जरी अंतिम प्रभागरचना जाहीर झाली असली तरी आरक्षण जाहीर होणे बाकी आहे. आरक्षण कसे जाहीर होते, या कडे इच्छुकांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे निवडणुकीचे खरे चित्र हे दिवाळी नंतरच स्पष्ट होणार आहे.