

पुणे : भारतातील तरुणाईला नशेच्या गर्तेत ओढण्यासाठी बँकॉकमार्गे अमली पदार्थांची तर हवाला रॅकेटसाठी दुबईमार्गे कोट्यवधींच्या डॉलर्सची तस्करी केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.(Latest Pune News)
मागील काही महिन्यांत पुणे विमानतळावर कस्टम विभागाने केलेल्या सलग कारवायांतून हायड्रोपोनिक गांजा, मेथाक्वालोनसारखे अमली पदार्थ तसेच कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन जप्त केले असून, त्यातून तस्करीचे आंतरराष्ट्रीय जाळे उघडकीस आले आहे.
सामान्य प्रवाशांना फुकट प्रवास, नोकरी आणि रोख प्रलोभन दाखवून ‘मध्यस्थ’ म्हणून वापरणाऱ्या या टोळ्यांच्या कारवायांमुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ ड्रग व हवाला रॅकेटचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी दक्ष कस्टम विभागामुळे या तस्करीला आळा घालण्यात बऱ्याच अंशी यश आले आहे. अशा तस्कारांना रोखून कस्टम विभागाने त्यांना कारागृहात धाडले आहे. सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून हायड्रोपोनिक गांजा, मेथाक्वालोन यांसारखे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्याचप्रमाणे लाखो डॉलर्सचे चलन, विविध पॅकेजेस आणि बॅगांमधून पकडण्यात आले. अनेकदा प्रवाशांनाच ‘मध्यस्थ’ म्हणून वापरण्यात आले असून, काही महिला आणि एजंटांना अटकही केली आहे.
का वाढते तस्करी?
भारतातील तरुणांमध्ये नशेची मागणी झपाट्याने वाढत आहे. बँकॉकसारख्या शहरात सिंथेटिक आणि हायड्रोपोनिक ड्रग्स सहज उपलब्ध असून कमी किमतीत मिळतात. त्यामुळे तस्करांना भारतात कोट्यवधींचा नफा मिळतो. हवाला रॅकेटमुळे काळा पैसा परदेशी पाठविणे सुलभ होते. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार, स्थानिक टोळ्या आणि सामान्य प्रवाशांची सोपी उपलब्धता यामुळे हे जाळे बळकट होत आहे. फुकट प्रवास, नोकरीच्या ऑफर, रोख बक्षिसे यांचा वापर करून सामान्य प्रवाशांना आकर्षित केले जाते. काहींना माहिती नसते की त्यांच्या बॅगांमध्ये ड्रग्स किंवा चलन लपविलेले आहे. तर दबाव किंवा धमक्यांद्वारे काहींकडून हे काम जबरदस्तीने करवून घेतले जाते.
डॉलर तस्करी - पुणे विमानतळावरून 16 फेबुवारी 2025 रोजी चार लाख 100 अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले. या चलनाची भारतीय किंमत तब्बल तीन कोटी 47 लाख रुपये होती. डॉलर हवाला मार्गे दुबईला पाठविले जाणार होते. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक झाली. पुढील तपासात आरोपींच्या मुंबईतील घरातून 17 देशांचे कोट्यवधींचे परकीय चलन जप्त करण्यात आले.
कॉफीच्या पाकिटांत ड्रग्स- एका महिलेकडून कॉफीच्या पाकिटांत लपवून ठेवलेले पाच किलो 262 ग््रॉम मेथाक्वालोन हा अमली पदार्थ 18 सप्टेंबर 2025 रोजी जप्त करण्यात आला. तब्बल दोन कोटी 61 लाख रुपये किमतीचे हे ड्रग पुण्यात बँकॉकहून आणले होता. मात्र, कस्टमच्या गुप्तचर यंत्रणेने हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले.
भारतातील एनडीपीएस कायदा कठोर असून तस्करांना जन्मठेप किंवा जप्तीची शिक्षा आहे. मात्र, प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय सहकार्य, माहितीची देवाणघेवाण, विमानतळांवरील तपासणी आणि प्रवाशांमध्ये जनजागृती यांवर अधिक भर देणे आवश्यक आहे. तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणारे आणि काळा पैसा परदेशात पाठवणारे हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी काटेकोर कारवाई, जनजागृती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वयाची गरज आहे.
ऋषिराज वाळवेकर, विशेष सरकारी वकील, कस्टम विभाग, पुणे.