

नारायणगाव : निसर्गाचा लहरीपणाचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी ऑक्टोबर छाटणीची कामे सुरू केली आहेत. सततच्या पावसामुळे द्राक्ष वेलींची छाटणीची कामे लांबल्याने यावर्षीचा हंगाम 15 ते 20 दिवस उशिरा सुरू होणार आहे.(Latest Pune News)
जुन्नर तालुका निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहे. जम्बो, रेडग्लोब, शरद सीडलेस, क्रिमसन, किंगबेरी, फ्लेम, तास ए गणेश, सोनाका आदी जातीच्या द्राक्ष बागा तालुक्यात आहेत. यावर्षी सतत पडत असलेल्या पावसामुळे तसेच सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने जम्बो जातीच्या द्राक्ष घड निर्मितीवर परिणाम झाला आहे.
तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यात द्राक्ष बागांची छाटणी होते. सततच्या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात होणारी छाटणी करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी 15 ते 20 सप्टेंबर दरम्यान छाटणी केली. छाटणीनंतर प्रामुख्याने जम्बो जातीच्या द्राक्ष बागेत घडनिर्मिती कमी झाली असल्याचे व काडीतून बाहेर पडलेले घड लहान आकाराचे असल्याचे दिसून येत आहे. शरद सिडलेस, आरा 35,आरा 36 या जातीच्या द्राक्ष बागामध्ये घड निर्मिती समाधानकारक झाल्याचे दिसून येत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर द्राक्ष वेलींची पूजा करून द्राक्ष उत्पादकांनी लांबलेली द्राक्ष बागांच्या छाटणीची कामे सुरू केली आहेत. बागेतील पाला काढणे, काड्यांची छाटणी, छाटलेल्या काड्यांना औषध लावणे आदीची लगबग सुरु आहे.
5 नोव्हेंबर पर्यंत द्राक्ष बागांच्या छाटणीची कामे पूर्ण होतील. लांबलेल्या छाटणीमुळे यावर्षी फेबुवारी महिन्यात द्राक्षाचा काढणी हंगाम सुरू होण्याची चिन्हे आहेत. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे या वर्षी जम्बो द्राक्षामध्ये घडनिर्मितीवर परिणाम झाला आहे. तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर 170 एकर क्षेत्रात आरा 35,आरा 36 या अमेरिकन नवीन जातीची द्राक्ष लागवड झाली आहे. या जातीच्या छाटणी झालेल्या काड्यांमध्ये समाधानकारक घड निर्मिती झाली आहे. खत व औषधाच्या किंमती वाढल्यामुळे द्राक्षाची शेती परवडत नाही असे द्राक्ष उत्पादक विकास दरेकर यांनी सांगितले.
गुंजाळवाडीत सुरू असलेले द्राक्ष बाग छाटणीचे काम. (छाया : सुरेश वाणी)