

पुणे : वाचन चळवळीला चालना देणाऱ्या पुणे बुक फेअर 2025 अर्थात पुणे पुस्तक जत्रा या पुस्तक प्रदर्शनाला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. प्रदर्शनाचे यंदाचे 23 वे वर्ष असून, हे प्रदर्शन 2 नोव्हेंबरपर्यंत आपटे रस्त्यावरील सेंट्रल पार्कमध्ये 11 ते सायंकाळी 8 यावेळेत विनामूल्य पाहता येणार आहे. यंदाचे प्रदर्शन ज्ञानसंपन्न समाजाच्या दिशेने या बीदवाक्यावर आधरित असणार आहे.(Latest Pune News)
या प्रदर्शनात देशभरातील पुस्तक विक्रेते, वितरक, प्रकाशन संस्था, शैक्षणिक संस्था, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या प्रकाशन संस्थांचा सहभाग असेल. विविध विषयांवरील इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत आणि परदेशी भाषेतील पुस्तके, वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके आणि ग्रंथ पाहता येणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रदर्शनात मुलाखती, ज्येष्ठ साहित्यिकांबरोबर चर्चा, लेखक आपल्या भेटीला, हास्यमैफिल, बहुभाषिक कवी संमेलन, संगीत मैफिल आदी विविध विषयांवर कार्यक्रम होणार आहेत. त्याशिवाय व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद, सादरीकरणे देखील होतील. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे महानगरपालिका, आकाशवाणी केंद्र, राज्य शिक्षण विभाग आणि प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे, अशी माहिती प्रदर्शनाचे संयोजक पी. एन. आर. राजन यांनी दिली.