बावडा : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 5000 क्युसेक व पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक याप्रमाणे एकूण 6600 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, इंदापूर तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीची पाण्याची पातळी सध्या पूर्वपदावर आल्याचे चित्र रविवारी (दि. 5) पाहावयास मिळाले.(Latest Pune News)
उजनी धरणातून गेल्या 8-10 दिवसांपासून भीमा नदीपात्रात मोठ्या क्षमतेने सांडव्याद्वारे पाणी सोडले जात होते. त्यामुळे नदीला पूर आलेला होता. मात्र सध्या पुणे परिसरामध्ये पाऊस थांबल्याने, उजनी धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्याचे प्रमाण हे हळूहळू कमी करण्यात येऊन सध्या ते 5000 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आले आहे.
उजनी धरणामध्ये रविवारी (दि. 5) पाणीसाठा 117.23 टीएमसी एवढा असून, त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 53.57 टीएमसी एवढा आहे. सध्या धरणामध्ये 100 टक्के उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. तसेच दौंड येथून रविवारी उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 8 हजार 929 क्युसेक एवढा आहे.
आता शेतकऱ्यांचे लक्ष बंधारे अडविण्याकडे!
जलसंपदाच्या नियमानुसार प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये भीमा नदीवरील असलेले भाटनिमगाव, टणु, शेवरे हे बंधारे ढापे टाकून पाण्याने 100 टक्के क्षमतेने अडविले जातात. सध्या उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाण्याची प्रमाण कमी करण्यात आल्याने व लवकरच पाणी सोडणे पूर्ण बंद करण्यात येण्याची शक्यता असल्याने भीमा नदीवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने जलसंपदाकडून अडविण्याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिलेले आहे, असे प्रगतशील शेतकरी शरद जगदाळे पाटील (टणू), विलासराव ताटे देशमुख (नीरा नरसिंहपूर) यांनी सांगितले.