पुणे : महापालिकेतील 'सर्वांत महत्त्वाचे' मानल्या जाणाऱ्या शहर अभियंतापदासाठी अखेर पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहर सुधारणा समितीनेही या निवडीस मान्यता दिली. विद्यमान शहर अभियंता प्रशांत वाघमारे ३१ जानेवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने नव्या शहर अभियंत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू होती.
महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्यप्रमुख आणि शहर अभियंता ही चार पदे शासन मान्यताप्राप्त (स्टॅट्युटरी) आहेत. शहर अभियंत्यांवर बांधकाम विभागासह अभियांत्रिकीसंबंधित सर्व प्रमुख विभागांचे नियंत्रण असते. प्रशांत वाघमारे गेली २२ वर्षे या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर पुढील शहर अभियंता कोण होणार, याबाबत महापालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती.
या पदाची महत्त्वपूर्ण, प्रतिष्ठेची आणि अधिकारक्षम स्वरूपामुळे राज्य शासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रतिनियुक्तीवर या पदासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. मात्र, पुणे महापालिकेतील अधिकारीवर्गामध्ये 'शहर अभियंता' पद महापालिकेतीलच अधिकाऱ्याने भूषवावे', असा ठाम मतप्रवाह होता. त्यामुळे निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या पदासाठी विभागीय पदोन्नती समितीच्या दुपारच्या बैठकीत शहर अभियंता पदासाठी पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर व पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांची नावे स्पर्धेत होते. त्यापैकी पावसकर यांच्या नावावर अंतिम निर्णय झाला. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी शहर सुधारणा समितीसमोर ठेवण्यात आला होता, त्यांनीही पावसकर यांच्या नावाला संमती दिली आहे. आता हा प्रस्ताव मुख्य सभेच्या मान्यतेनंतर शासनाकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
शहरातील महत्त्वाचे प्रकल्प आणि इतर तातडीच्या कारणास्तव विद्यमान शहर अभियंता वाघमारे यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळू शकते, अशी चर्चा होती. मात्र, असा कोणताही प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला नसून वाघमारे यांनीही मुदतवाढ मागितलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.